वन्यप्राणी पकडणे-सोडणे ‘हायटेक’ होणार; चंद्रपूरमधील पशुवैद्यक अधिकाऱ्याची संकल्पना

महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्ष सातत्याने वाढत असताना वन्यप्राणी पकडणे आणि पकडलेल्या प्राण्यांना सोडणे हे कठीण आणि जिकरीचे काम झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यतील एका पशुवैद्यक अधिकाऱ्याच्या संकल्पनेतून आणि वनाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे रिमोटच्या सहाय्याने हाताळला जाणारा स्वयंचलित पिंजरा तयार करण्यात आला आहे.

अत्याधुनिक असा हा पिंजरा ३० फूट अंतरावर बसूनही रिमोटच्या सहाय्याने संचालित करता येतो. पिंजऱ्यातील यंत्रणेत नेटवर्क असणाऱ्या भ्रमणध्वनी कंपनीचे सिमकार्ड टाकायचे. ही यंत्रणा हाताळण्यासाठी असणारा अ‍ॅप संबंधित वनाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीत राहील. पिंजऱ्याच्या आत तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे रात्रीदेखील काम करतील. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पिंजऱ्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपता येतील. विशेष म्हणजे, वाघांच्या अंगावरील पट्टे यामुळे तपासता येतील. त्यासाठी वारंवार पिंजऱ्याच्या जवळ जाण्याची गरज नाही. त्यात आता पुन्हा अत्याधुनिक सेन्सर लावण्यात येणार आहे. ज्यामुळे वन्यप्राणी आता गेल्यानंतर तो आपोआप बंदिस्त होईल. पिंजऱ्याच्या खालच्या बाजूला एक सेन्सर लावण्यात येणार असून या माध्यमातून त्या प्राण्याचे वजन कळेल. याआधी वन्यप्राण्याचे वजन करण्यासाठी त्याला बेशुद्ध करावे लागत होते. चौथा अधिकचा कॅमेरा पिंजऱ्याच्या बाहेर  लावण्यात आला आहे. त्याला ३० फु टाची वायर आहे. ज्यामुळे पिंजऱ्यातील वन्यप्राणी जंगलात सोडताना दुरूनच चित्रीकरण होईल. सौर पॅनलवर आधारित पिंजऱ्याला एक बॅटरीही देण्यात आली आहे. चार्ज करून ठेवलेली ही बॅटरी किमान १८ तास पिंजरा संचालित करू शकेल. त्यामुळे पावसाळ्यात अडचण येणार नाही. मानव-वन्यजीव संघर्ष तिथे अधिक आहे त्याठिकाणी तो नेहमीसाठी कामात येईल.

चार वर्षांपासून ही संकल्पना डोक्यात होती. डी.आर. इंडस्ट्री, मध्य चांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांच्यासोबत चर्चा केली. त्याचा आराखडा तयार करून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राचे उपसंचालक गुरुप्रसाद यांना दाखवला, तेव्हा त्यांनी आमची ही संकल्पना उचलून धरली. अत्याधुनिक तंत्रज्ञान वनखात्यात येत असेल तर पैशाची चिंता करू नका, असा विश्वास त्यांनी दिला. आज त्यांच्यामुळेच अत्याधुनिक तंत्रज्ञानानी युक्त आणि मानव-वन्यजीव संघर्षांच्या काळात उपयोगी पडेल, असा पिंजरा आम्ही तयार करू शकलो.

– डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी

माणसांद्वारे हाताळाव्या लागणाऱ्या पिंजऱ्यांमध्ये जोखीम अधिक होती. डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी रिमोटद्वारे हाताळता येणाऱ्या पिंजऱ्याची संकल्पना मांडली. चेतन आणि आकाश या आमच्या दोन अभियंत्यांच्या सहकार्याने आम्ही तो तयार केला. आजपर्यंत आम्ही साधे पिंजरे तयार केले. गुरुप्रसाद आणि गजेंद्र हिरे या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आम्ही ते तयार करू शकलो.

– धम्मदीप रामटेके, डी.आर. फार्मा