24 November 2017

News Flash

क्रिकेट सट्टय़ाच्या पैशांसाठी सराफा व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला व एका आरोपीला अटक केली.

खास प्रतिनिधी, नागपूर | Updated: September 9, 2017 2:41 AM

पारस जैन

  • सोनसाखळी लंपास, एकाला अटक
  • ५.५० लाखांची आयपीएलची उधारी

आयपीएल किक्रेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या सराफा व्यापाऱ्याच्या मुलाने ५ लाख ५० हजार रुपये न दिल्याने त्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली.

चेतन तेलंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पारस सुनील जैन (१८) रा. छाप्रुनगर असे फिर्यादी मुलाचे नाव आहे. त्याच्या वडिलांचा वैश्य नावाच्या व्यक्तिसोबत भागीदारीत सराफाचा व्यवसाय आहे. तर पारस हा रायसोनी महाविद्यालयात बी.बी.ए. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांला शिकत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयपीएल सामन्यांवर शहरात मोठय़ा प्रमाणात सट्टा खेळला गेला. त्यात पारसनेही सट्टा लावला.

यात तो ५ लाख ५० हजार रुपये हरला होता. तेव्हापासून तो पैसे देत नसल्याने चेतन तेलंग व इतर क्रिकेट बुकी त्याच्याकडे पैशाचा तगादा लावत होता. तो त्यांना थापा मारत असल्याने आज शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पारस हा जितेश खंडवानी, उमेश आणि कुणाल या मित्रांसह दोन दुचाकींनी वर्धमाननगर परिसरातून फिरत असताना काळ्या रंगाची होंडा सिटी आणि एका आय-२० गाडीतून सात ते आठजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी पारसला गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी झटापट झाली. त्याचे मित्र आरडाओरड करू लागले. त्यामुळे आरोपी पळून गेले. मात्र, त्यांच्या हातामध्ये पारसच्या गळ्यातील सोनसाखळी सापडली. त्यानंतर दुपारी ४ वाजता पारस हा आपल्या वडिलांना घेऊन लकडगंज पोलीस ठाण्यात पोहोचला व तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला व एका आरोपीला अटक केली.

आरोपी जैनकडे वाहनचालक होता

पोलिसांनी चेतन तेलंग या आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे. त्याने क्रिकेट सट्टय़ाचे पैसे पारसकडे असल्याचे सांगितले. चेतन हा पूर्वी सुनील जैन यांच्याकडे वाहनचालक होता. त्यानंतर तो क्रिकेट सट्टा व्यवसायात शिरला. त्याने नोकरी सोडली. आज त्याच्याकडे स्वत:च्या तीन कार असून तो क्रिकेट बुकी व्यतिरिक्त वाहतूक व्यवसाय करतो.

First Published on September 9, 2017 2:41 am

Web Title: cricket betting attempt to kidnap trader son nagpur crime