News Flash

नागपूर ते भंडारा क्रिकेट सट्टा तेजीत

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम सुरू असून क्रिकेट सट्टय़ासाठी कुख्यात नागपूरचा बाजार तेजीत आला आहे

नागपूर ते भंडारा क्रिकेट सट्टा तेजीत

पोलीस अधिकाऱ्यांचा आशीर्वाद

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम सुरू असून क्रिकेट सट्टय़ासाठी कुख्यात नागपूरचा बाजार तेजीत आला आहे. नागपुरातील अनेक दिग्गज क्रिकेट बुकी नागपूरबाहेर क्रिकेटचा व्यवसाय करीत असून आता भंडारा जिल्ह्य़ाच्या परिसरात हा व्यवसाय जोरात सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या व्यवसायातून स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी शिपाई ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा क्रिकेट बुकींना आशीर्वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांमध्ये स्पर्धा आहे. देशात संध्या भारत आणि इंग्लंड दरम्यान कसोटी मालिकेनंतर आता ट्वेंन्टी २० मालिका खेळली जात आहे. २९ जानेवारीला दोन्ही संघात दुसरा आंतरराष्ट्रीय ट्वेंन्टी २० सामना नागपुरात खेळला जाणार आहे. एरवी देशात क्रिकेट सट्टय़ात नागपूरचे नाव मोठे आहे. या ठिकाणी अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी आहेत. त्यामुळे नागपूर शहरातील क्रिकेट सट्टय़ावर सर्वाची नजर असते. विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ या राज्यातील अनेकजण या व्यापारात गुंतले आहेत. या पाश्र्वभूमीवर क्रिकेटचा सट्टा बाजार अतिशय तेजीत आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या ट्वेंन्टी २० सामन्यावर जरीपटका पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात वसंतशहा चौकातील प्लॉट क्रमांक-२६२ क्रमांकाच्या घरात क्रिकेट सट्टा घेतला जात होता. त्यावेळी त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून पाचजणांना अटक करण्यात आली. यात विनय चंद्रभान वासवानी (३४), रा. ६४, दयानंद कॉलेज मागे, गुलशन चंद्रकुमार टिकीयानी (२४) रा. २६२, वसंतशहा चौक, राकेश मोहनलाल वाधवानी (४९) रा. २८५, वसंतशहा चौक, राकेश मोहनलाल वाधवानी (४९) रा. २८५, वसंतशाह चौक, पवन मोहनलाल वाधवानी आणि लखन वाधवानी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, विविध कंपन्यांचे १९ मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे असा एकूण ७ लाख, १७ हजार, १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईनंतर शहरातील क्रिकेट बुकी सतर्क झाले आहेत. नागपूर शहरात केव्हाही कारवाई होण्याची भीती असल्याने आता क्रिकेट बुकींनी शहरातील काही पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि भंडारा गुन्हे पोलिसांच्या संगनमताने नागपूर शहर, ग्रामीण व भंडारा जिल्ह्य़ाच्या सीमावर्ती भागात हा व्यवसाय थाटला असल्याची माहिती आहे.

नागपूरच्या सामन्यावर जोर

नागपुरात आंतरराष्ट्रीय ट्वेंन्टी २० सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारतासाठी अतिशय महत्त्वाचा असून या सामन्यात भारत पराभूत झाल्यास मालिका गमवेल. त्यामुळे या सामन्यावर सर्व क्रिकेट बुकींची नजर असून खायवडी-लगवडीचे दरही अधिक ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल बुकींच्या तिजोरीत कोटय़वधी रुपये जमा होण्यास मदत करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 2:57 am

Web Title: cricket betting more found in nagpur and bhandara
Next Stories
1 रिपाइंने वाढीव जागांची मागणी केल्याने भाजपसमोर नवा पेच
2 पोलिसांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या दाम्पत्यास अटक
3 मायक्रो फायनान्सविरुद्ध एसआयटीचा घोषणा हवेतच
Just Now!
X