प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याचा पर्याय टाळला जात असल्याचे चित्र

पाणीटंचाई आणि आयपीएल सामने यावरून राज्यात सुरू झालेल्या वादाच्या झळा आता विदर्भातही पोहोचल्या आहेत. राज्यातील सर्वच क्रिकेट मैदानावर लाखो लिटर पाण्याच्या उधळपट्टीवर स्वयंसेवींनी नाराजी दर्शवलेली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनसह राज्यातील सर्वच ठिकाणच्या मैदानांवर रोज लाखो लीटर पाण्याची उधळपट्टी होत आहे. मात्र, यासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याचा पर्याय असूनही तो टाळला गेल्याचे समोर आले आहे.

क्रिकेट मैदानावरील हिरवळ कायम राखायची असेल तर दररोज पाणी फवारण्याशिवाय पर्याय नाही. या प्रत्येकच मैदानावर हजारो लिटर पाणी फवारले जाते. नागपुरातील जामठा येथील व्हीसीएच्या मैदानावरही (विदर्भ क्रिकेट असोसिएशन) हिरवळ कायम राखण्यासाठी दर दिवशी ५० ते ६० हजार लिटर,  तर त्याचवेळी सिव्हील लाइन्समधील जुन्या व्हीसीए मैदानावर ४० ते ४५ हजार लिटर पाणी फवारले जाते. जामठा येथील व्हीसीएचे मैदान ग्रामीण क्षेत्रात येते.

या क्षेत्रातील पाणी कायद्यानुसार कुपनलिकेच्या पाणी वापरासंदर्भात काही नियम घालून देण्यात आले आहेत. कुपनलिकेचे पाणी पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरसाठी वापरले जावे तसेच महाराष्ट्र जल प्राधिकरण कायद्याअंतर्गत ग्रामीण भागात केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठय़ानुसार ३० टक्के पाणी पिण्यासाठी, ६० टक्के पाणी सिंचनासाठी आणि १० टक्के पाणी औद्योगिक वापरासाठी दिले जावे.

यातही सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी विशेष नियमानुसार परवानगी दिली जाते. याव्यतिरिक्त पाण्याचा उपयोग केला जात असेल तर तो नियमभंग ठरतो.

जामठय़ातील मैदानासंदर्भात हे दोन्ही नियम मोडीत निघाले आहेत. मैदानावरील हिरवळीसाठी चक्क कुपनलिकेचे पाणी फवारले जाते, तर सिव्हील लाइन्समधील व्हीसीएच्या मैदानावर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा असली तरीही कुपनलिकेचे पाणीसुद्धा वापरले जाते.

नागपुरात पाण्याचा दुष्काळ नसला तरीही पिण्यासाठी असणारे पाणी मैदानावर वाया घालवले जात असल्याने व्हीसीएचे दोन्ही मैदाने वादात अडकण्याची शक्यता आहे.

सांडपाणी वापरण्याचा पर्याय

विदेशात स्वयंपाकगृह आणि स्नानगृहातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते आंघोळ व इतर घरकामांसाठी वापरले जाते. नागपुरातून दररोज ५०० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. त्यातील १०० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर भांडेवाडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाते आणि १३० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर महाजनको प्रक्रिया करून वापरते. या १०० दशलक्ष लिटर सांडपाण्यातून एक लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे र्निजतुकीकरण केल्यास ६० हजार लिटर र्निजतूक पाणी मिळू शकते. ते जामठा क्रिकेट मैदानावर वापरल्यास कुपनलिकेतून वाया घालवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची बचत केली जाऊ शकते, असा पर्याय पर्यावरण अभ्यासक व जलतज्ज्ञ कौस्तुभ चटर्जी यांनी सुचवला आहे.

‘प्रक्रिया केलेलेच पाणी वापरतो’

जामठय़ातील क्रिकेट मैदानावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. हे प्रक्रिया केलेले पाणी कुपनलिकेत सोडून आम्ही मैदानावर फवारणीसाठी वापरतो. शिवाय, रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची सोय मैदानावर असून, त्या पाण्याचासुद्धा फवारणीसाठी वापर केला जातो, अशी प्रतिक्रिया व्हीसीएचे माजी अभिरक्षक प्रवीण हिंगणीकर यांनी दिली.