पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव

दिवसेंदिवस गुन्ह्य़ाचे स्वरूप बदलत असून प्रत्येक जिल्हानिहाय एक सायबर सेल स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्या अंतर्गत नागपूर पोलीस आयुक्तांतर्गत आर्थिक गुन्हे शाखेच्या परिसरात अत्याधुनिक सायबर सेल तयार करण्यात आले. मात्र, या सेलमधून पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर सहकार्य मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून गुन्हे शाखेने आता स्वत:करिता स्वतंत्र सायबर सेल तयार करण्याचे ठरवले आहे.

फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ऑनलाईन व्यवहार, ई-ट्रेडिंग, ई-बँकिंग आदींमुळे ऑनलाईन फसवणूक करणे, बदनामी करणे आदी प्रकार वाढले आहेत. दिवसेंदिवस गुन्ह्य़ांचे स्वरूपही बदलत असून त्याचा  छडा लावण्याकरिता पोलिसांनी आरोपींचा सीडीआर काढणे, त्यांचे टॉवर लोकेशन तपासणे आदींची तातडीने गरज पडते. त्याकरिता गृह विभागाने प्रत्येक जिल्हानिहाय एक सायबर सेल तयार  करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला. त्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्य़ात सायबर सेल स्थापन करण्यात आला. पोलीस आयुक्तालयांतर्गत गुन्हे शाखेच्या जुन्या कार्यालयात अत्याधुनिक सायबर सेलचे निर्माण करण्यात आले. तेथे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आता संगणक तज्ज्ञांपेक्षाही नागपूर पोलीस दलातील कर्मचारी सायबर गुन्ह्य़ांचा तपास करण्यात पारंगत झाले असून लोकांना दिलासा मिळावा म्हणून पोलीस आयुक्त सायबर तक्रार निवारण केंद्र (सी ३) सुरू केले. त्यातून ऑनलाईन फसवणूक व इतर घटनांची थेट नोंद घेऊन तपास करण्यात येते.

मात्र, सायबर सेलचा सर्वाधिक उपयोग हा खून, दरोडा, अपहरण आदी गुन्ह्य़ांचा तपास करण्यासाठी आरोपींचा सीडीआर काढणे, त्यांचे टॉवर लोकेशन शोधणे आदीसाठी करण्यात येतो. पूर्वी गुन्हे शाखा अधिकाऱ्यांच्या अखत्यारितच सायबर सेल होते. मात्र, आता गुन्हे शाखेचे कार्यालय गिट्टीखदान येथे हलवण्यात आले, तर सायबर सेल हे आर्थिक गुन्हे शाखेच्या अखत्यारित ठेवण्यात आले. अनेकदा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना प्रकरणाच्या तपासाकरिता सायबर सेलची मदत मागायची असल्यास तेथील अधिकाऱ्यांना विनंती करावी लागते. मात्र, सायबर सेलमधील अधिकारी व कर्मचारी गुन्हे शाखेला हवे तसे सहकार्य करीत नसल्याची माहिती आहे. शिवाय सायबर सेलमधून माहिती मिळण्यास विलंब लागतो. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर संबंधित आरोपीचे टॉवर लोकेशन मिळेपर्यंत तो शहराबाहेर निघून गेलेला असतो. लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर अपहरण व हत्याकांडात याचा अनुभव गुन्हे शाखा पोलिसांना आला. तेव्हापासून सायबर सेलमधील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने स्वतंत्र सायबर सेल निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे, हे विशेष.

तपासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न

गुन्हे शाखेच्या कार्यालयापासून सायबर सेल लांब आहे. गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी तपास करताना आपल्या कार्यालयात माहितीची आदानप्रदान करीत असतात. रात्री-अपरात्री सायबर सेलची आवश्यकता भासते. एखादा गुन्हा घडून गेल्यानंतर आरोपींना अटक करणे, मुद्देमाल जप्त करण्यासाठी सायबर सेलची नितांत गरज आहे. केवळ तपासाची गती वाढवण्यासाठी गुन्हे शाखेतही सायबर कक्ष निर्माण करण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांकडून पोलीस कर्मचारी चिरीमिरी घेत असल्याची बाब अद्याप समोर आली नाही. मात्र, त्या अनुषंगानेही चौकशी करण्यात येईल.

  – संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा