शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौकात बंदोबस्तावर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांची वर्दी उतरवून देण्याची धमकी देत येथील एका कारखान्याला आग लावून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनाच्या नगरसेविका अल्का दलाल आणि त्यांचे पती अजय दलाल यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमनगर परिसरात सन २०१०मध्ये अंबिका केमिकल कारखाना सुरू करण्यात आला. २०१२ पर्यंत कंपनीच्या संचालकांनी महापालिकेकडून परवान्याचे नियमित नूतनीकरण केले. मात्र, त्यानंतर चार वषार्ंपर्यंत कंपनी परवाना नूतनीकरण केले नाही. पुलगाव येथील केंद्रीय शस्त्रास्त्र आगारात झालेल्या भीषण स्फोटानंतर शांतीनगर पोलिसांनी परिसरातील केमिकल कारखान्यांची माहिती गोळा केली. त्यावरून या कारखान्यावर छापा मारून ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कारखान्यातून येणाऱ्या वासामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगत शिवसेनाच्या नगरसेविका अल्का दलाल व त्यांचे पती ४ जूनच्या सकाळी ९.३० वाजता कारखाना परिसरात गेले. त्यांनी येथे घोषणा सुरू केल्या. अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांसह इतर अधिकारीही येथे पोहचले. त्यांना बघून नगरसेविकेसह पतीने संतप्त होत गणवेश उतरवून देण्याची आणि प्रसंगी केमिकल कारखान्याला आग लावून देण्याची धमकी दिली. पोलीस अधिकाऱ्यांना अर्वाच्च शब्दात याप्रसंगी धमकावण्यासह त्यांना उतरवून बोलण्याचा प्रकार बघता सरीता अभिषेक यादव यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात नगरसेविका व पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.