१४ जीपसह ८६ नवीन वाहने पोलिसांना सोपवली

नागपूर : क्राईम चार्ली ही नवीन संकल्पना नागपूर शहर पोलीस दलात राबवण्यात येत असून या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्या अंतर्गत १४ जीप आणि ७२ दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून  आता नागरी सुरक्षा अधिक बळकट होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीअंतर्गत शहर पोलिसांना १४ जीप व ७२ दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या. या वाहनांचे लोकार्पण सोमवारी सायंकाळी पोलीस मुख्यालय परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. करोनाकाळात पोलिसांनी उल्लेखनीय काम केले आहे. भर उन्हात पोलिसांनी  करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोलाची मदत केली. नवीन वाहनांमुळे पोलीस अत्यंत कमी वेळात घटनास्थळावर पोहोचतील, असेही राऊत म्हणाले.

आयुक्तालयांतर्गत ७८ संवेदनशील भागाची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी महिलांची छेड काढण्याच्या घटना घडल्याची नोंद आहे. या ठिकाणांवर दिवसरात्र पोलीस गस्त घालतील. नवीन चार्ली योजना यानिमित्ताने आयुक्तालयात सुरू करण्यात आली आहे. ४६४ पोलिसांना नवीन गणवेश (डांगरी) देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील पोलीस ठाण्याअंतर्गत ७२ बीट असून तेथेही या वाहनांद्वारे पोलीस गस्त घालतील. सर्वच प्रकारच्या मदतीसाठी ११२ हा क्रमांक लवकरच सुरू होणार असून, त्यासाठीही या वाहनांची मदत होईल, असे पोलीस आयुक्त अमितेश

कुमार म्हणाले. संचालन व आभार पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी केले.