खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

भूखंड विक्री व्यावसायिकाच्या तरुण मुलाचे तिघांनी मिळून अपहरण केले व त्याच्या वडिलांना तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. पोलिसांनी अपहृताची सुटका करून तिघांना अटक केली.

स्वप्नील प्रदीप मेश्राम रा. रचना नित्या अपार्टमेंट, सहकारनगर असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी श्रेयश शेखर बोरकर (२५) रा. सुभाषनगर, कामगार कॉलनी, राहुल दिगांबदर मेश्राम (२४) रा. गोपालनगर आणि दिनेश नत्थुजी शहाणे (२५) रा. भामटी, त्रिमूर्तीनगर या आरोपींना अटक केली आहे. त्यांना उद्या शुक्रवापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

स्वप्निल अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षांला शिकत आहे. त्याच्याच महाविद्यालयात आरोपी श्रेयस हाही शिकतो. काही दिवसांपूर्वी स्वप्निलने श्रेयसकडून ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यावर श्रेयसने चक्र वाढ व्याज लावले होते. स्वप्निलने थोडे-थोडे करीत जवळपास १ लाख लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम श्रेयसला दिली. तरीही श्रेयशने त्याच्याकडे १६ हजार रुपये शिल्लक असल्याचे सांगितले. दरम्यान आरोपींनी संगनमताने त्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून तीन लाख रुपये मागण्याचा कट रचला. २८ एप्रिलला सकाळी स्वप्नील एमएच-३१, ईटी-३८४९ क्रमांकाची दुचाकी घेऊ न घराबाहेर पडला. आरोपींनी त्याला भ्रमणध्वनी करून तुकडोजी चौकात भेटायला बोलवले. तेथे कारमध्ये कोंबून त्याचे अपहरण केले. आयटी पार्क परिसरात आल्यानंतर त्याला वडिलांना फोन करून तीन लाखांची व्यवस्था करण्यास सांगितले.

फ्लॅटमध्ये डांबून मारहाण

आरोपींनी स्वप्नीलला एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले. या ठिकाणी आरोपींनी त्याला पैसे परत न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. रात्रभर त्याला मारहाणही केली. याची तक्रार पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी त्याच्या वडिलांना पैसे देण्याची तयारी दर्शवण्यास सांगितले व सापळा रचून स्वप्नीलची दुसऱ्या दिवशी सुखरूप सुटका केली.

श्रेयशची प्रेयसीही सोबत

स्वप्नीलला डांबून ठेवण्यात आलेल्या फ्लॅटमध्ये त्याची प्रेयसीही होती. पण, पोलिसांनी तिला आरोपी न करताच सोडून दिले. त्यामुळे पोलिसांनी तरुणीला अर्थपूर्ण सहकार्य केल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.