21 September 2020

News Flash

उपराजधानीतील गुन्हयांमध्ये १३०५ ने घट

गृहमंत्र्यांकडून गुन्हेगारीचा आढावा

आढावा बैठकीत उपस्थित गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी.

गृहमंत्र्यांकडून गुन्हेगारीचा आढावा

नागपूर : उपराजधानीतील गुन्हेगारीत कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये शहरात ४ हजार ७९३ गुन्हे दाखल झाले होते. यंदा त्यात १ हजार ३०५ गुन्हयांची घट असून आतापर्यंत ३ हजार ४८८ गुन्हेच दाखल झाले आहेत. यावरून नागपूर पोलिसांचे काम योग्य दिशेने सुरू असल्याचा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

पोलीस दलात करोनाचा शिरकाव आणि गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी देशमुख यांनी आज शनिवारी पोलीस जिमखाना येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपायुक्त विनीता शाहु, विवेक मासळ, विक्रम साळी, गजानन राजमाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत उपस्थित होते. शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ऑपरेशन क्रॅक डाऊन, ऑपरेशन वाईप आऊट, रस्त्यावरील गुन्हेगारी, महिलांची छेड काढणाऱ्यांविरुद्ध ऑपरेशन स्ट्रीट ड्राईव्ह, हद्दपारांना शोधण्यासाठी हिट स्कॉट, गुन्हेगार दत्तक योजना, रात्री अडचणीत असलेल्या महिलांसाठी होम ड्रॉप योजना, विधिसंघर्ष बालकांकरिता केअर उपक्रम, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये व समाजिक सौहार्द टिकून राहण्याच्या उद्देशाने सामाजिक पोलिसिंग असे उपक्रम राबवले. यामुळे गुन्हेगारीत घट होण्यास मदत झाली. यंदा आतापर्यंत गेल्यावर्षीच्या तुलनेत खून ९ ने कमी आहेत. त्याशिवाय सोनसाखळी चोरीच्या घटना ४५, जबरी चोरी ४९, घरफोडी, १५०, वाहनचोरी ३९१, विश्वासघात १४, दुखापत १७, पळवून नेणे १५५, बलात्कार १२, विनयभंग, २६, प्राणांतिक अपघात ५१, विवाहित महिलांचा छळ १३ आणि इतर गुन्हे २३३ असे एकूण १ हजार ३०५ गुन्हे कमी दाखल झालेत, अशी माहिती बैठकीत समोर आली. या माहितीवर गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

अट्टल गुन्हेगार कारागृहाबाहेर नकोत

अट्टल गुन्हेगार कारागृहाबाहेर नसावेत. त्यानंतरही अशाप्रकारचे गुन्हेगार समाजात उजळ माथ्याने फिरत असतील तर लोकांनी त्यांची तक्रार पोलिसांत करावी. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस जिमखाना येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. मंगेश कडव, प्रीती दास, साहिल सय्यद, तपन जयस्वालसारखे अनेक गुन्हेगार राजकीय पक्षांचा वापर करून लोकांना लुबाडतात. असे पांढरपेशा गुन्हेगार वा संतोष आंबेकरसारख्या कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध काहीही तक्रार असल्यास पोलिसांना कळवा. उपराजधानीत असे गुन्हेगार रस्त्यावर फिरायला नकोत, यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री म्हणाले.

११७ गुन्हेगारांविरुद्ध ‘मोक्का’

सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना कारागृहात डांबून ठेवणे खूप मोठे आव्हान आहे. अशा २० गुन्हेगारी टोळयांची  पाश्र्वभूमी विचारात घेऊन शहर पोलिसांनी ११७ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ लावला. जुलै २०१८ ते जुलै २०२० या कालावधीमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कालावधीमध्ये १६ हजार ७१२ गुन्हेगारांविरुद्धही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ५० गुन्हेगारांना महाराष्ट्र धोकायदाक कृत्य प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई करून कारागृहात डांबण्यात आले.

कारागृहातून बाहेर पडलेल्यांकडून १० खून

करोनाकाळात उपराजधानीत घडलेल्या १७ खुनांच्या घटनांपैकी १० खून कारागृहातून तात्पुरत्या रजेवर बाहेर पडलेल्या गुन्हेगारांनी केले.  करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  कारागृहातील १२ हजार गुन्हेगारांना तात्पुरती रजा देण्यात आली होती. इतर कैद्यांमध्ये करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून कैदी सोडणे गरजेचे होते, असेही गृहमंत्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 5:32 am

Web Title: crime in nagpur decreased by 1305 zws 70
Next Stories
1 कुलगुरूपदी डॉ. सुभाष चौधरी यांची निवड
2 प्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य!
3 उद्धव ठाकरेंनी फेटाळला वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव
Just Now!
X