|| मंगेश राऊत

कोटय़वधींचे अपहार होत असताना सायबर शाखा झोपेतच

नागपूर : २०१९ मध्ये  सायबर सेलमध्ये तीन हजारांवर तक्रारी स्वीकारण्यात आल्या. त्यापैकी केवळ २ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले. यावरून उपराजधानीतील सायबर सेल कुंभकर्णी निद्रेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिवसेंदिवस सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत आहेत. यात प्रामुख्याने बनावट कार्डद्वारे फसवणूक, कार्ड क्लोनिंग, लॉटरी, नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक, कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष आदी गुन्हे प्रकारांचा समावेश आहे. ऑनलाईन फसवणुकीद्वारे नागपूरकरांचे ८ कोटी ८१ लाख ३५ हजार ८८९ रुपये लुबाडण्यात आले. त्यापैकी केवळ ९ लाख ६६ हजार ३०७ रुपये परत आणण्यात सायबर शाखेला यश आले. उर्वरित पैशांचा कुठेच हिशोब नसून पीडित लोक सायबर सेलचे उंबरठे झिजवून थकले आहेत. याशिवाय बनावट प्रोफाईल तयार करणे, हॅकिंगद्वारे लुटणे, ओळख चोरी करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश समाज माध्यमावर टाकणे, बनावट संकेतस्थळ तयार कणे, संगणकातील डाटा चोरणे, लहान मुलांच्या निळी चित्रफितीचे प्रकार, मोबाईल चोरी, विविध मार्गाने ऑनलाईन ब्लॅकमेलिंग आदी स्वरूपाच्या १३० तक्रारी सायबर सेलला गेल्यावर्षी प्राप्त झाल्या. ऑनलाईन फसवणूक व इतर प्रकारच्या सर्व तक्रारी मिळून सायबर सेलने एकूण ३ हजार २३ तक्रारी स्वीकारल्या. त्यापैकी केवळ दोन प्रकरणात गुन्हे दाखल केले असून उर्वरित तक्रारी कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या उपराजधानीसाठी सायबर सेलची ही कासवगती शोभणारी नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही लोकांच्या समस्यांना विचारात घेऊन सायबर सेलची गती वाढवावी, अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.

तक्रारदारांनाच हाकलून लावले

प्रभाकर गुजर यांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन चोराने ८७ हजार ४९९ रुपये लंपास केले होते. याची तक्रार त्यांनी सायबर सेलला दिली. २१ नोव्हेंबर २०१९ ला सायबर सेलने तक्रार नोंदवली. तेव्हापासून तक्रारीवर कोणतीच प्रगती झाली नाही. सायबर सेलकडून त्यांना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. गुजर व त्यांचे जावई वारंवार सायबर सेलमध्ये खेटे घालत होते. एक दिवस सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुमच्या तक्रारीवर काहीच होणार नाही, वारंवार येऊ नका, तुमच्यासारखे शेकडो लोकांसोबत असे घडले असून पैसे परत मिळत नाही, असे सांगून परत पाठवले. हा प्रसंग गुजर यांच्या जावयाने लोकसत्ताशी संपर्क साधून सांगितला.

सायबरमध्ये ३ हजारांवर तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी अनेक तक्रारींवर कारवाई करण्यात आलेली आहे. अनेक तक्रारींवर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले असून काही तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.  गुन्हा दाखल करण्यासाठी अनेकदा फिर्यादीच नकार देतात. तीन हजारांवर तक्रारींमध्ये केवळ दोन गुन्हे दाखल करण्यात आले, ही माहिती खरी नाही.

– रवींद्र कदम, सहपोलीस आयुक्त.