गुन्हेगारी वर्तुळातील कुख्यात संतोष आंबेकरचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी नागपूर पोलिसांनी फास आवळला असून त्याच्यासह टोळीविरुद्ध सोनेगाव पोलीस ठाण्यात गुजरातच्या व्यापाऱ्याची एक कोटी रुपयांनी फसवणूक करून खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल केला आहे. यात संतोष व्यतिरिक्त रमेश ऊर्फ राम पाटील (३९) आणि त्याचा भाचा सनी वर्मा यांनाही आरोपी करण्यात आले आहे. राम पाटील व सनी वर्मा यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

हेमंत मोहन पुरोहित (३१) रा. किसन अपार्टमेंट, देसाई वॉर्ड, वापी, गुजरात असे तक्रारदार व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचा कॉस्मो प्लास्टिक व भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायाकरिता त्यांना नागपुरात भूखंड हवा होता. २८ ऑगस्ट २०१८ ला ते नागपुरात आले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांची भेट राम पाटीलसोबत झाली. यावेळी राम पाटील याने महाराष्ट्रात कुठेही जमीन मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. व्यवसाय करण्यासाठी नागपुरात भूखंडाची आवश्यकता असल्याने त्यांनी राम पाटीलवर विश्वास टाकला. राम पाटीलने त्यांची भेट संतोषसोबत घालून दिली. जमीन खरेदीसाठी सर्वप्रथम बालाजी फर्ममध्ये २५ लाख भरायला सांगितले. त्यांनी पैसे भरले. कालांतराने त्यांना दोन हजार व ५०० रुपयांच्या नोटांचा व्यवसाय करण्यामध्ये मोठा नफा मिळणार असल्याचेही आमिष दाखवले. एक कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास नोटांवर एक लाख रुपये अधिक मिळतील, असे आश्वासन दिले. हेमंत पुरोहित यांनी वापी येथे एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यावेळी त्यांना दहा रुपयाची अर्धी फाटलेली नोट देण्यात आली. त्या नोटवर ४४एम८०९६८१ असा क्रमांक होता. त्यांना त्यांची रक्कम व अधिकचा नफा नागपुरात बालाजी फर्ममध्ये मिळेल, असे सांगण्यात आले. ते आपले पैसे घेण्यासाठी नागपूर विमानतळावर पोहोचले. त्या ठिकाणी राम पाटील याने संतोषशी पुन्हा भेट घालून दिली. त्यांच्याकडून दहा रुपयाची अर्धी फाटलेली नोट हिसकावून परत जाण्यास सांगण्यात आले. ते परत गेले. काही दिवसांनी त्यांनी पैशाकरिता संतोषला भ्रमणध्वनी केला असता त्याने पैसे विसरण्यास सांगितले. त्यांना यावेळी जीवे मारण्याची धमकी दिली व पुन्हा खंडणीही मागितली. यापूर्वी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी संतोष, त्याचा भाचा नीलेश केदार व इतर दोन आरोपींना अटक केली आहे. आता सोनेगाव पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलिसांच्या एकंदर कारवाईवरून संतोषचे गुन्हेगारी क्षेत्रातील साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे.

पुन्हा एकाची १ कोटीने फसवणूक – दहा-बारा तक्रारींवर चौकशी सुरू

संतोष आंबेकरविरुद्ध आता अनेक जण समोर येत आहे. त्याला अटक झाल्याची माहिती समजल्यानंतर अनेकांनी गुन्हे शाखेत तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारींची चौकशी सुरू आहे. यात फसवणूक, खंडणी मागणे, बलात्कार करणे आदी स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश आहे. चौकशी पूर्ण होताच व गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असल्यास तशी कारवाई करता येईल. या टोळीवर मोक्का लावण्याचे अद्याप निश्चित नाही. – गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त, गुन्हे. ईडी, आयकर विभागाला संपत्तीची माहिती

गेल्या काही वर्षांमध्ये संतोषने गुन्हेगारीच्या जोरावार कोटय़वधीची संपत्ती जमवली आहे. त्याच्या संपत्तीची झाडाझडती घेण्यात येत आहे. त्याने ही संपत्ती कुठून व कशाप्रकारे मिळवली, याचा तपास करण्यासाठी सक्तवसुली संचालनालय व आयकर विभागाला माहिती कळवण्यात येणार आहे. भविष्यात त्याला एकेक पैशाचा हिशोब सादर करावा लागेल. – डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त