22 April 2019

News Flash

मुख्यमंत्र्यांच्या शहरात खुनाचे सत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुचाकीच्या वादातून दगडाने ठेचून दोघांची हत्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असून काही दिवसांपासून शहरात खुनाचे सत्र सुरू आहे. गृहविभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वत:च्याच शहरातील गुंडांवर नियंत्रण मिळविता येत नसेल तर राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कसे कमी करणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्तीनगरच्या मागच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेत जुगार, दारू आणि पैशाच्या वादातून दोन युवकांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. रवी प्रकाश डुले (२६) रा. गोपालनगर आणि बंटी उर्फ संदीप शरद आटे (२९) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मनोज भारद्वाज (२५) याला अटक केली आहे. रवी हा बर्डीवर ऑटोरिक्षा चालवित होता, तर आरोपी मनोज आणि बंटी हे सेन्ट्रींगचे काम करीत होते. काही दिवसांपूर्वी मनोजने रवीकडून हिरो प्लेजर कंपनीची दुचाकी मागितली होती. रवीने आपल्या नातेवाईकाची दुचाकी मनोजला दिली. परंतु मनोजने रवीकडून घेतलेली दुचाकी स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्याकडे तारण ठेवली होती. याची माहिती मिळताच रवी हा मनोजला दुचाकी परत करण्याचे किंवा दुचाकी सोडविण्यासाठी पैशाची मागणी करीत होता.
दरम्यान, मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास रवी हा बंटी, मनोज आणि इतर पाच ते सहा मित्रांसह इंद्रप्रस्थनगर परिसरातील बाजाराच्या ठिकाणी विदेशी दारू प्राशन करून जुगार खेळत बसला होता. रात्री ११.३० वाजेपर्यंत ते दारू पित होते. त्यानंतर तेथून एक-एकजण घरी जाऊ लागला. त्या सुमारास त्यांची दारूही संपली. शेवटी रवी, बंटी आणि मनोज हे तिघे त्या ठिकाणी थांबले होते. त्यांना पुन्हा दारूची आवश्यकता होती. त्यामुळे दारू कोण आणणार, यावरून रवी आणि मनोजमध्ये वाद झाला.
या वादातून दुचाकीचा मुद्दा आला असता मनोजने दुचाकी आणली आणि रवीला दिली. परंतु त्यानंतरही भांडण सुरूच होते. त्यामुळे रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मनोजने दारूच्या नशेत शेजारचे सिमेंटचे पत्रे घेऊन रवीच्या डोक्यावर मारले. यात रवी रक्तबंबाळ झाला असता बंटी आरडाओरड करू लागला. त्यामुळे मनोजने बंटीच्या डोक्यातही दगड घातला. यानंतर रवी आणि बंटी गतप्राण झाले असता मनोजने त्यांना संपविण्याच्या उद्देशाने पुन्हा त्यांच्या डोक्यात दगड घातले.
रवी आणि बंटीचा मृत्यू झाल्यानंतर मनोज हा दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. सकाळी नैसर्गिक क्रियेसाठी जाणाऱ्या रहिवाशांना बाजारपेठच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा दिसला आणि काही अंतरावर दोन मृतदेह पडले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. एका युवकाने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून खुनाविषयी माहिती दिली. यानंतर बुधवारी सकाळी ६ वाजता सोनेगाव, राणाप्रतापनगर येथील पोलीस घटनास्थळी पोहाचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.
मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आणि आरोपी मनोजला सकाळी ९.३० च्या सुमारास त्याच्या घरून अटक केली. मनोजने एकटय़ानेच खून केले की त्याच्यासोबत कुणी होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्यासोबत दारू पिणाऱ्या काहींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु मनोजने आपण एकटय़ानेच दोघांनाही संपविल्याची माहिती पोलिसांना दिली.

तिहेरीनंतर दुहेरी हत्याकांड
मंगळवारी गुमगाव येथील वृंदावन सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर एकाने तीन युवकांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. या घटनेने संपूर्ण नागपूर हादरले असताना बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या दुहेरी खुनामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महेश वासनिक याला त्याच्या आईनेच सुपारी देऊन संपविले होते. सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत क्षुल्लक कारणावरून एकाने दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून मारल्याची घटना अजून ताजीच आहे.

ऑक्टोबरमध्ये १२ खून
पोलीस आयुक्त एस. पी. यादव यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचे सांगितले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात नाकाबंदी करण्यात येत असतानाही गुन्हेगारी थांबत नसल्याचे चित्र आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात शहरात १२ खून झाले. या घटनांवरून असे लक्षात येते की, शहरातील गुन्हेगारींवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

First Published on November 19, 2015 12:54 am

Web Title: crime rate increase in nagpur
टॅग Crime Rate