अनेक वर्षांपासून नवीन पदनिर्मिती नाही

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्या वाढीसोबत गुन्ह्य़ांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. मात्र, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांच्या संख्येत मात्र कोणतीच वाढ झाली नाही. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळावर अतिरिक्त ताण पडत असून पोलिसांच्या आरोग्यावर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे.

विकासासोबत गुन्हेगारी वाढते, हे सर्वज्ञात आहे. नागपूरचा विकास दिवसेंदिवस होत आहे. विकासासोबत शहरात मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार आणि ग्रामीण भागातून लाखोंचे लोंढे शहरात दररोज दाखल होतात. त्यापैकी बहुतांश वर्ग हा मजूर आहे. शहर अनियंत्रितपणे फुगत असून नागरी सुरक्षेचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनाही अनेक बाबींचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री येथील असल्याने नागपूरच्या गुन्हेगारीवर सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

अशात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असल्याची बाब राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालावरून स्पष्ट होते. २०१४ मध्ये शहरात १० हजार ३५९ दखलपात्र गुन्ह्य़ांची नोंद झाली, तर २०१५ मध्ये ११ हजार १८ दखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले. एका वर्षांत ६५९ गुन्हे वाढले. मात्र, पोलिसांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहराकरिता ८ हजार ४२९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५ हजार ४५९ पदे भरलेली असून उर्वरित पदे रिक्त आहेत. आयुक्तालयात २९ पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक ठाण्यात ८० ते १५० कर्मचारी मंजूर आहेत. मात्र, कोणत्याच पोलीस ठाण्यात मंजूर पदांइतके कर्मचारी नाहीत. शिवाय बंदोबस्त, गुन्हे तपास, पोलीस ठाण्याचे काम आदींसाठी पोलिसांचा तुटवडा जाणवत आहे. अनेक पोलीस ठाण्यांनी अतिरिक्त पोलिसांची मागणी केली. त्यातही मानकापूर, शांतीनगर आणि बजाजनगर नवीन ठाण्यात आहे. त्याच पोलिसांमधून बदली करण्यात आली. नवीन ठाणे निर्माण झाल्यानंतर नवीन पदांची निर्मिती होणे आवश्यक असते, परंतु अद्याप नवीन पदांची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे नागपूर पोलिसांसमोर आहे त्या मनुष्यबळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान आहे.

२५ लाखांवर गुन्हेगार

शहर पोलिसांनी गुन्हेगारांचा लेखाजोखा तयार केला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार २५ लाख गुन्हेगार आहेत. त्यापैकी १ लाख गुन्हेगार हे वारंवार गुन्हे करणारे आहेत, तर जवळपास १ लाख गुन्हेगार विविध टोळ्यांसाठी काम करीत असून शहरात ५० वर कुख्यात टोळ्या विविध गुन्हे करीत असल्याची माहिती आहे. या सर्वावर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे.