News Flash

अतिक्रमणाला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा

राजेश कराडे हे अधिकाऱ्याचे नाव असून ते महापालिकेच्या धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त आहेत.

न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई, महापालिकेत खळबळ
राज्यात कायदे मोडणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री सांगत असले तरी त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेतील एक अधिकारी मात्र अतिक्रमाला संरक्षण देत असल्याचे आढळून आल्याने सत्र न्यायालयाने त्याला आरोपी ठरवत त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
राजेश कराडे हे अधिकाऱ्याचे नाव असून ते महापालिकेच्या धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त आहेत. त्यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्याचा हा महापालिकेतील आजवरच्या इतिहासातील अलीकडच्या काळातील एकमेव प्रसंग असावा.
वेस्ट हायकोर्ट मार्गावरील शंकरनगर भागातील पॅनोरामा या इमारतीतील बेकायदेशीर बांधकामाच्या संदर्भातील हे प्रकरण आहे. या इमारतीतील डॉ. शिरीष धांदे यांनी वाहनतळाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात रितेश शर्मा यांनी महापालिकेच्या धरमपेठ झोन कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यावरून या कार्यालयाने डॉ. धांदे यांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या व तसे न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, धांदे यांनी अतिक्रमण काढले नाही व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर शर्मा यांनी महापालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे दाद मागितली, कराडे यांची भेट घेऊन अतिक्रमण काढण्याची विनंती केली. त्यांच्या या प्रयत्नांना कोणीच दाद दिली नाही, अखेर शर्मा यांनी महाराष्ट्र म्युनसिपल कार्पोरेशन कायद्याच्या कलम ३९७ अ(२) अन्वये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.आर.अग्रवाल यांच्याकडे फौजदारी अर्ज दाखल केला. न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अंबाझरी पोलिसांना दिले. पोलिसांनी चौकशी केली. या दरम्यान त्यांनी राजेश कराडे यांचीही जबानी नोंदवली व इमारतीत झालेल्या अतिक्रमणाची पाहणी करून न्यायालयात अहवाल सादर केला. शर्मा यांनी या प्रकरणात वरिष्ठपातळीवर केलेल्या तक्रारींचा आणि त्यावर न झालेल्या कारवाईचीही माहिती घेऊन अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.आर. अग्रवाल यांनी अतिक्रमण काढण्यासाठी कराडे यांनी कुचराई केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे स्पष्ट करीत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र म्युनसिपल कार्पोरेशन कायदा कलम ३९७ अ (२) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश अंबाझरी पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

कारवाई न करण्यासाठी मुंबईतून दबाव?
डॉ. धांदे यांनी केलेले अतिक्रमण काढू नये म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव येत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयातून या संदर्भात वरिष्ठांना दूरध्वनी आल्याची माहिती आहे. त्यामुळेच तक्रारकर्ते रितेश शर्मा यांनी धरमपेठ झोनच्या अधिकाऱ्याविरुद्ध आयुक्तांकडे आणि महापौरांकडे तक्रारी करूनही त्यावर कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे धरपेठ झोननेच डॉ. धांदे यांना सुरुवातीला अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेत ‘तुन्हाला जे करायचे ते करा’ या शब्दात दम दिला, असे तक्रारकर्ते रितेश शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 2:09 am

Web Title: criminal offense against officer for protecting encroachment
टॅग : Encroachment
Next Stories
1 सोनिया व राहुल गांधी एका व्यासपीठावर
2 व्याघ्र प्रकल्पांमधील कॅमेरेही असुरक्षित
3 मेडिकलमधील ‘रेडिओथेरपी’च्या पदव्युत्तर पदवीला विदेशात मान्यता नाही!
Just Now!
X