मुसळधार पावसामुळे पूर्व विदर्भावर पुराचे सावट असल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील हजारो विद्यार्थी पुरात अडकले आहेत. त्यामुळे १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जेईई मुख्य परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे संकट ओढवले असून पूर्व विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांवर परीक्षेला मुकण्याची वेळ आली आहे.

दोन वर्षांपासून या परीक्षेची जेईईची तयारी करणारा विद्यार्थी पुरामुळे तणावात असून शासनाने पूरपरिस्थिती लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलावी, अन्यथा हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांना पाठविण्यात आले आहे.

१ ते ६ सप्टेंबपर्यंत जेईई मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.  विदर्भासाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला ही परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षा सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई मुख्य परीक्षेसाठी अर्ज केले आहेत.

या चारही जिल्ह्य़ांतील अनेक गावांना पुराने वेढले आहे. भंडारा व गडचिरोली शहरांसह येथील अनेक गावे पुराखाली आहेत. अशा स्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी कसे पोहोचावे, हा गंभीर प्रश्न उभा झाला आहे. त्यातच भंडारा आणि गोंदिया येथील विद्यार्थ्यांसाठी नागपूर हे एकमेव परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना एवढा लांबचा प्रवास करून परीक्षेसाठी पोहोचणे अडचणीचे आहे.

त्यामुळे दोन वर्षांपासून या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठे संकट ओढवले असून परीक्षा पुढे ढकलावी अन्यथा मोठी अडचण निर्माण होईल, असे निवेदन शैक्षणिक कार्यकर्ता नितेश बावनकर यांनी दिले आहे. याशिवाय गडचिरोलीचे पालकांकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.