News Flash

अनामत रकमेचे कोटय़वधी रुपये महाविद्यालयांच्या खात्यात

नियमानुसार विद्यार्थ्यांना पैसे परत न केल्याचे उघड

महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्काशिवाय अनामत रक्कम घेतली जाते. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी पाचशे ते एक हजारांपर्यंत अनामत रक्कम जमा करतात. नियमानुसार विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्यासोबत त्याला ही रक्कम परत करणे बंधनकारक आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांना हे पैसेच परत केले जात नसल्याने राज्यातील अनेक महाविद्यालयांच्या खात्यात ही रक्कम पडून असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

स्टुडंट हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील महाविद्यालये प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि अन्य कारणांसाठी अनामत रक्कम घेतात. पाचशे ते हजार रुपयांपर्यंत ही रक्कम असते. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये हे शुल्क अधिक असते. अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाच ते आठ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेतली जाते. मात्र, विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेले हे शुल्क विद्यार्थ्यांना परतच केले जात नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी रक्कम परत मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असले तरी महाविद्यालये अनेक कारणे सांगून ही रक्कम आपल्या खात्यात जमा ठेवतात. त्यामुळे अनामत रकमेच्या नावावर ठेवलेले कोटय़वधी रुपये राज्यातील महाविद्यालयांच्या खात्यात पडून आहेत. या विरोधात स्टुडंट हेल्पिंग हँड संघटनेने आवाज उठवला आहे.

माहिती अधिकारातून समोर आलेल्या सत्याच्या आधारे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांना निवेदन देत महाविद्यालयांची ही मनमानी थांबवून अनामत रकमेची रक्कम परत घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तपशीलवार माहिती सादर करण्याचे आदेश

राज्यातील सर्व अशासकीय महाविद्यालयांकडे जमा असलेल्या अनामत रकमेची माहिती घेऊन ती सादर करण्याचे आदेश राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी सहसंचालकांना दिले आहेत. महाविद्यालयनिहाय तपशीलवार ही माहिती गोळा करून संचालकांकडे जमा करावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 12:17 am

Web Title: crores of rupees of deposit in the account of colleges abn 97
Next Stories
1 पोलिसांच्या मारहाणीत हात मोडलेला कामठी येथील मांस विक्रेता
2 लसीकरणाला गोंधळाचे ग्रहण!
3 केंद्रीय पथक पुन्हा नागपुरात धडकले
Just Now!
X