मंगेश राऊत

एकेकाळी एकाच कक्षात बसून सोबत सोबत वकिली करणारे उपराजधानीतील दोन सुपुत्र सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून प्रथमच एकाच खंडपीठात बसणार आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात न्या. शरद बोबडे आणि न्या. भूषण गवई यांचे खंडपीठ राहणार आहे. दोन मराठी व्यक्ती व एकमेकांसोबत वकिली करणारे चांगले मित्र न्यायमूर्ती म्हणून एकत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयातून न्यायदान करण्याचा हा दुर्मिळ योग महाराष्ट्रासह नागपूरकरांना अनुभवता येणार आहे.

न्या. शरद बोबडे यांचा जन्म १९५६ मध्ये झाला. २९ मार्च २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची शपथ घेईपर्यंत ते नागपूर खंडपीठात वकिली करीत होते. यावेळी ते खंडपीठातील बार क्रमांक-२ च्या कोपऱ्यातील २५ क्रमांकाच्या कक्षात (क्युबिकल) बसायचे. १९९० च्या दशकात त्यांच्यात कक्षात न्या. भूषण गवईही बसायचे. न्या. बोबडे आणि न्या. गवई हे एकमेकांचे घनिष्ठ मित्र असल्याचे उपराजधानीतील न्यायपालिका व वकील वर्तुळात सर्वज्ञात आहे. न्या. गवई हे २००३ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. न्या. बोबडे एकएक पायरी समोर चढत गेले व त्यांच्या पाठीमागे न्या. गवई होते. काही दिवसांपूर्वी न्या. गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. सध्या न्या. गवई हे न्या. संजीव खन्ना यांच्यासोबत एका खंडपीठात बसत आहेत. पण, जुलैच्या पहिल्या आठवडय़ात ते न्या. बोबडे यांच्यासोबत बसतील. दोन मराठी व्यक्तिमत्त्व, एकाच शहरातील रहिवासी, एकाच खंडपीठात वकिली करणारे आणि एकाच क्युबिकलमध्ये बसणारे चांगले मित्र सर्वोच्च न्यायालयाच्या एकाच खंडपीठात बसून न्यायदान करण्याचा हा दुर्मिळ योग आहे.

सरन्यायाधीश होण्याचाही योग

उपराजधानीतून न्या. विवियन बोस, न्या. मोहम्मद हिदायतुल्ला हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्या. विकास सिरपूरकर हे न्यायमूर्ती झाले. पण, ते सरन्यायाधीश होऊ शकले नाहीत. आता नोव्हेंबर महिन्यात न्या. शरद बोबडे हे भारताचे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणारे त्यांचे सहकारी न्या. गवई हे २०२५ मध्ये भारताचे सरन्यायाधीश होतील, हाही मोठा आनंददायी योग आहे.