News Flash

महापालिकेची सांस्कृतिक अनास्था

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शहरात नागपूर महोत्सव सुरू करण्यात आला.

नागपूर महोत्सव, नाटय़ स्पर्धा गुंडाळल्या

शहराचे सांस्कृतिक वैभव वाढावे आणि स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महापालिकेने सुरू केलेला नागपूर महोत्सव आणि महापौर नाटय़ करंडक नाटय़ स्पर्धा बंद करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक महोत्सव बंद करून निधी दुसऱ्या विकास कामासाठी वळवला आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत महापालिकेची अनास्था समोर आली आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शहरात नागपूर महोत्सव सुरू करण्यात आला. काही वर्षे यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. स्थानिक कलावंतांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांना निमंत्रित करण्यात आले होते. या महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरकरांना मोठी सांस्कृतिक मेजवानी मिळत होती. मात्र, यावर्षी महापालिकेने हा महोत्सव न घेण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने खासदार सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला. त्यात महापालिकेचा वाटा होता. मात्र, नागपूर महोत्सव स्वतंत्रपणे घेतला जाईल, असे महापालिका प्रशासन आणि सत्ता पक्षाच्यावतीने जाहीर केले होते. महापालिकेची आर्थिक स्थिती बघता यावर्षी हा महोत्सव रद्द करण्यात आला असून महोत्सवाचा निधी दुर्बल घटक विभागाकडे वळता करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या सहकार्याने शहरातील नाटय़ कलावंतांसाठी महापौर करंडक नाटय़ स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेच्या निमित्ताने स्थानिक नाटय़ कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध झाले होते. राज्य पातळीवरील एकांकिका या महोत्सावच्या निमित्ताने सादर केल्या जात होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून महापौर करंडक रद्द करण्यात आला आहे. नाटय़ परिषदेने पुढाकार घेऊन या महोत्सवाची सुरुवात केली होती. त्यानंतर परिषदेने हात काढून घेतले. त्यामुळे या नाटय़ महोत्सवाची जबाबदारी कुणाकडे द्यावी यावरून महापालिकेत मतभेद झाले आणि अखेर स्पर्धा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या महापौर करंडकामध्ये कलावंतांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जात होती आणि त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र निधीची व्यवस्था केली होती. मात्र हा निधी सुद्धा दुसऱ्या विकास कामासाठी वळता करण्यात आला आहे. दोन्ही महोत्सव यावर्षी रद्द केल्यामुळे त्यातून महापालिकेची सांस्कृतिक अनास्था या निमित्ताने समोर आली आहे.

नागपूर महोत्सव आणि महापौर करंडक नाटय़ स्पर्धा महापालिकेचे उपक्रम  होते. मात्र, यावर्षी ते होणार नाहीत आणि तसा प्रस्ताव नाही. त्याऐवजी दिवाळीमध्ये सांस्कृतिक महोत्सव घेण्याचे प्रयोजन आहे आणि त्या दृष्टीने प्रस्ताव तयार केला जात आहे. नागपूर महोत्सवाचा निधी वळता करण्यात आला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल.   – नागेश सहारे, क्रीडा व सांस्कृतिक समिती

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:31 am

Web Title: cultural indifference in nagpur
Next Stories
1 पाल्यांच्या आरटीई प्रवेशासाठी पालकांचीही लबाडी
2 चंद्रपूरमध्ये रुग्णालयात गॅसगळतीमुळे पळापळ, रुग्ण, गरोदर स्त्रियांना काढलं बाहेर
3 मेट्रोच्या ट्रेलरने कर्मचाऱ्यालाच चिरडले
Just Now!
X