ठिय्यावरील कामगार व घर कामगार महिलांना मोठा फटका

पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलण्याच्या निर्णयाचा मजुरी करून पोट भरणाऱ्या ठिय्यावरील रोजंदारी कामगारांसह घर कामगार महिलांना मोठा फटका बसला असून त्यांना कुटुंबात दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.नोटा बंदीचा समाजातील गोरगरीब लोकांना चांगलाच फटका बसला आहे. कंत्राटदारांकडे काम करणाऱ्या ठिय्यावरील कामगारांना दररोजची मजुरी दिली जाते, परंतु आठवडाभरापासून ती मिळत नाही. पाच दिवस सलग काम केले तर ठेकेदार उपलब्ध असलेली दोन हजाराची नोट देतो, मात्र ती नोट बाजारात घेऊन गेले तर त्यांना सुटे मिळत नाहीत. त्यामुळे दररोजचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

[jwplayer eW0sv8sU]

शहरातील विविध भागात १६ ठिकाणी ठिय्या असून जवळपास ३० ते ४० हजारांच्यावर कामगार या ठिय्यावर उभे असतात. शहरातील इमारत बांधकाम किंवा घराची रंगरंगोटी असेल तर त्या ठिकाणी या कामगारांना काम मिळत असते. मात्र, गेल्या काही दिवसात त्यांच्या हाताला काम नाही. ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी किमान पाच ते सहा दिवस काम केल्यानंतर दोन हजारांची नोट दिली जाते. त्यामुळे त्यांच्यासमोर चिल्लरचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मानेवाडा आणि महाल भागातील काही ठिय्या कामगारांची भेट घेतली असता मानेवाडा भागातील ठिय्या कामगार सदाशिव काटले म्हणाले, या ठिय्यावर जवळपास २०० ते २५० ठिय्या कामगार दररोज काम मिळेल या आशेने येतात. त्यातील काहींना काम मिळते तर कोणाला मिळत नाही. गेल्या आठ दिवसांपासून बिल्डरकडे काम केल्यावर आता पैसे मिळत नाहीत. सलग चार दिवस काम केले तर दोन हजारांची नोट दिली जाते मात्र ती नोट बाजारात घेऊन गेले तर सुटे मिळत नाही. बँकेत गर्दी असल्यामुळे सुटे मिळत नाही. अनेक ठिय्या कामगारांकडे पॅन कार्ड किंवा आधार कार्डसुद्धा नाही. त्यामुळे अशा कामगारांना अडचणी येत आहेत.

महाल भागातील ठिय्या कामगार मनोज भेलावे म्हणाला, चार दिवस काम मिळाले नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. पाचशे रुपयांची एक नोट होती, मात्र बाजारात ती चालत नाही. त्यामुळे दैनंदिन खर्च कसा करावा ते कळत नाही. केवळ एका ठिय्यावर ही समस्या नाही तर शहरातील सर्व भागात कामगारांची हीच समस्या आहे. मोदींनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बदलल्या मात्र पोटापाण्याचे आणि मोलमजुरीचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अनेक घर कामगार महिलांची सुद्धा हीच समस्या आहे. दिवाळीच्या दिवसात अनेक लोकांनी वेतनात पाचशे आणि एक हजारांच्या नोटा दिल्या आहेत. त्यातील काही नोटा खर्च न करता घरी ठेवल्या आहेत. आता त्या उपयोगात नसल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. नंदनवन झोपडपट्टी भागात राहणाऱ्या अनेक महिला कामगारांना घर चालविणे कठीण झाले आहे. किराणाच्या दुकानात गेले तर ते उधारीवर देत नाही आणि पाचशे रुपयांची नोट घेत नाहीत. त्यामुळे आम्ही रोजचे सामान आणायचे कुठून, असा प्रश्न अंजनाबाईने उपस्थित केला.

पाचशेच्या नव्या नोटा सोमवारपासून 

नोटाबंदीमुळे मागील दहा दिवसांपासून बँका व एटीएमसमोर असलेली नागरिकांची गर्दी आता ओसरू लागली आहे. शहरातील बहुतांश एटीएम सुरळीत सुरू होते. बँकेबाहेर देखील कमी प्रमाणात रांगा दिसून आल्या. आता नागरिकांना सोमवारपासून चलनात येणाऱ्या पाचशे रुपयांच्या नव्या नोटा मिळणार आहेत. त्या दिवशी पुन्हा बँकांसमोर गर्दी होण्याची शक्यता आहे. गुरुवापर्यंत एका व्यक्तीला चार हजार पाचशे रुपये बदलण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र शुक्रवारपासून ती रक्कम कमी करून दोन हजार रुपये करण्यात आली. अनेकांनी या निर्णयाबद्दल नाराजी देखील व्यक्त केली. नागरिक बँकांमध्ये वरंवार नोटा बदलण्यासाठी येत असल्याने ग्राहकांच्या बोटावर शाई लावली जात असल्याने देखील गर्दीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. दरम्यानच्या काळात शंभर रुपयांच्या नोटांवर व्यवहार होत असल्याने अनेक मोठे व्यवहार ठप्प झाले होते.

ठिय्यावर काम करणाऱ्या कामगारांना आणि घरकामगार असलेल्या ४० टक्के महिलांवर पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलाचा परिणाम झाला आहे. विशेषत: ठिय्या कामगारांना रोजची रोजी मिळत असताना ती मिळत नाही. महिला कामगारांना दिवाळीच्यावेळी त्यांचे मानधन मिळाले. त्यामुळे त्यांच्यासमोर फारशा अडचणी नाहीत. ज्या महिलांनी मिळालेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा ठेवून दिल्या आहेत, त्यांना सुटे पैसे मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. बँकेत भरावा लागणारा अर्ज त्यांना समजत नाही. त्यामुळे त्या रांगेत लागून परत येतात. त्यांच्यासमोर रोजचा खर्च कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

– डॉ. रूपा कुळकर्णी,

[jwplayer xpbAHLf3]