हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याचा फटका समाजातील विविध घटकांना बसला असतानाच, सरकारने रॉकेल पुरवठादारांना जुन्या नोटा स्वीकारण्यास अद्याप परवानगी दिलेली नसल्याने रॉकेलच्या वाटपावर परिणाम झाला आहे. परिणामी ग्राहकांना रॉकेल मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत.

चलनातील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून वीज, पाणी बिल, मालमत्ता कर व अन्य शासकीय देयकांसाठी २४ नोव्हेंबपर्यंत हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास सरकारने परवानगी दिली; परंतु सार्वजनिक वितरण प्रणालीतील केरोसिन खरेदी-विक्री करताना त्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील लोकांना बसला आहे. ग्रामीण भागात तालुक्यांची गावे वगळल्यास एटीएम नाही. नोटाबंदीनंतर अनेक एटीएम बंद पडले आहेत. लोकांच्या हातात पैसा नसल्याने दररोजच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही लोकांना कठीण झाले आहे. त्यातल्या त्यात केरोसिन वितरकांना पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई असल्याने केरोसिन दुकानापर्यंत पोहोचलेला नाही. ग्रामीण भागात स्वयंपाक, विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने दिवाबत्तीची सोय करण्यासाठी आणि पाणी गरम करणे आदी कामांसाठी केरोसिन वापर मोठय़ा प्रमाणात होतो. थंडीचे दिवस सुरू झाले आहेत; परंतु गावातील दुकानात केरोसिन नसल्याने जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. वितरक दुकानदारांकडून जुन्या नोटा घेऊ शकत नसल्याने त्यांनी १२ हजार लिटर क्षमता असलेले टँकर तहसील कार्यालयासमोर उभे केले आहेत. या प्रकारामुळे लोकांना केरोसिन मिळत नाही तर वितरकाची गाडी रिकामी होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली.

केरोसिन वितरकांना परवानाधारक दुकानदारांना महिन्याच्या २५ तारखेपर्यंत पुरवठा करावयाचा ठरतो. त्यानंतर त्या महिन्यातील केरोसिनचा कोटा रद्द ठरत असतो. त्याचा परिणाम पुढील महिन्यातील कोटय़ात होत असतो. मागील महिन्यात केरोसिन ज्या प्रमाणात वाटप झाले. त्याच प्रमाणात पुढच्या महिन्यात केरोसिनचा कोटा ठरवण्यात येतो. या फटका केरोसिनचा वापर करणाऱ्यांना बसणार आहे.

महाराष्ट्राचा दर तीन महिन्याचा केरोसिनचा कोटा १ लाख ४२ हजार किलोलिटर एवढा आहे. राज्य सरकार केंद्राकडून हा कोटा एकदम उचलते; परंतु वितरकांना तीन टप्प्यांत देते. यामुळे वितरकांना गावाखेडय़ांत केरोसिन पोहोचवण्याकरिता नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. या धोरणामुळे नोव्हेंबर महिन्यात पुणे आणि सोलापूर जिल्ह्य़ात एकाही वितरकाने केरोसिन उचललेले नाही.

पेट्रोल पंप, गॅस वितरण, औषधविक्रेते यांना जुन्या नोटा घेण्याची परवानगी आहे. गुजरातमध्ये केरोसिन वितरक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारत आहेत; परंतु महाराष्ट्रातील केरोसिन वितरकांना या नोटा स्वीकारण्याची परवानगी नाही. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी केरोसिनने भरलेले टँकर उभे आहेत.   नीलकंठ बिजनोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट केरोसिन डिलर असोसिएशन.