News Flash

आता आव्हान महाविद्यालय प्रवेशाचे!

बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता विद्यार्थी व पालकांसमोर महाविद्यालय प्रवेशाचे मोठे आव्हान आहे.

आता आव्हान महाविद्यालय प्रवेशाचे!
पुनर्मूल्यांकन अर्ज दाखल करण्यासाठी मंडळाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांच्या अशा रांगा लागल्या होत्या. (लोकसत्ता छायाचित्र)

नामांकित महाविद्यालयात ‘कटऑफ’ वाढणार; पुनर्मूल्यांकनासाठीही विद्यार्थ्यांच्या रांगा

बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता विद्यार्थी व पालकांसमोर महाविद्यालय प्रवेशाचे मोठे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर  विद्यापीठाकडून महाविद्यालयातील  प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असून त्यानुसारच सर्व महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी विद्यार्थ्यांनी  पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाच्या कार्यालयात एकच गर्दी केली होती. राज्यातील इतर शिक्षण विभागाच्या तुलनेत नागपूर विभागाची टक्केवारी अतिशय कमी आहे. निकालात घट झाली असली तरीही विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये  गर्दी होण्याची शक्यता आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी ‘कटऑफ’देखील वाढणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे अधिक आहे. आधी अभियांत्रिकी आणि अन्य अभ्यासक्रमांकडे वळणारे विद्यार्थी आता मूलभूत विज्ञानाकडे वळले आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेतील प्रवेश आता सोपा राहिलेला नाही. मागील वर्षीसुद्धा विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील सर्व प्रवेश पहिल्या आठवडय़ातच पूर्ण झाले होते. शेवटी शासनाने २० टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी देखील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे असल्याने तीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात कला शाखेच्या ४० हजार जागा, वाणिज्य शाखेच्या ३० हजार जागा तर विज्ञान शाखेच्या ३५ हजार जागा होत्या. गृहविज्ञानच्या ४०० आणि गृह अर्थशास्त्राच्या ५०० जागा होत्या. यावर्षीच्या जागांची संख्या अजून जाहीर झालेली नाही.

प्राप्त गुणांवर विद्यार्थी असमाधानी

बारावीच्या परीक्षेत विविध विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याची अनेक विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यापैकी अनेकांनी बुधवारी मंडळाच्या कार्यालयात पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केले. यासाठी मोठी रांग लागली होती.  काही विद्यार्थ्यांनी त्यांना अपेक्षेपेक्षा फारच कमी गुण मिळाल्याने तर काही विद्यार्थ्यांनी त्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक अवघ्या दोन-चार  गुणांमुळे हुकल्याने अर्ज दाखल करीत असल्याचे सांगितले.   काही विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयात फक्त ३६च गुण मिळाले. शाळांकडून ३० गुण दिले जातात, माग आम्ही काय सहाच गुणांचा पेपर सोडवला का, असा त्यांचा सवाल होता.

पालक संतापले

फेरमूल्यांकनासाठी मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांनी गर्दी केली असतानाही मंडळाने त्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त एकाच खिडकीची व्यवस्था केली होती. त्यामुळे संथपणे काम सुरू होते. दुसरीकडे बाहेर कमालीचे उन्ह होते. पारा ४६ वर गेला होता. त्यामुळे उन्हात उभे राहणेही विद्यार्थ्यांना असह्य़ होत होते. मंडळाने काहीही सोय केली नव्हती. त्यामुळे पालक संतापले व त्यांनी त्यांची नाराजी मंडळाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. यावेळी गोंधळही झाला. त्यानंतर अर्ज स्वीकारण्यासाठी खिडक्यांची संख्या वाढवण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2019 1:04 am

Web Title: cutoff will be increased in the nominated college
Next Stories
1 शहरातील अपघात घटले, पण मृत्यूसंख्या तेवढीच!
2 लोकजागर :वैदर्भीय काँग्रेसचा ‘मृतसाठा’ही आटतोय!
3 उपराजधानीचे तापमान ४७.५ अंशांवर
Just Now!
X