|| मंगेश राऊत

केवळ ९ लाख परत आणण्यात सायबर सेलला यश

नागपूर : उपराजधानीतील सायबर सेल अतिशय कार्यक्षम असल्याचा दावा करण्यात येत असला तरी तो पोकळ असल्याची माहिती  ‘लोकसत्ता’च्या हाती आली आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये उपराजधानीकरांना ८ कोटी ८१ लाख ३५ हजार ८८९ रुपयांनी गंडा घालण्यात आला. सायबर सेलला तपास करून यातील केवळ ९ लाख ६६ हजार ३०७ रुपये परत आणण्यात यश आले. गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्ह्य़ांमध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यानुसार सायबर सेललाही अधिक परिश्रम करण्याची आवश्यकता असताना नागपूर पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलचे काम मात्र दिवसेंदिवस ढेपाळत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये सायबर सेल अंतर्गत फसवणुकीच्या २ हजार ३९१ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यापैकी १ हजार ९७४ तक्रारी सायबर सेलकडे प्रलंबित आहेत.  २८१ तक्रारी पोलीस ठाण्यांकडे आहेत. या तक्रारींमध्ये लोकांची ८ कोटी ८१ लाख ३५ हजार ८८९ रुपयांनी फसवणूक झाली असताना सायबर सेलला केवळ ९ लाख ६६ हजार ३०७ रुपयेच परत मिळवण्यात यश आले. या आकडेवारीवरून उपराजधानीचे सायबर सेल ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांना हुडकून काढण्यात अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होते. पण, अद्यापही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याची दिसत नसून सायबर सेलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याचे दिसते.

दररोज आढावा घेण्यात येतोय

सायबर सेलच्या कामगिरीचा दररोज आढावा घेण्यात येत आहे. प्रत्येक विभागानुसार प्रकरणांची वर्गवारी करून लोकांना लुबाडण्यासाठी वापरण्यात येणारी प्रक्रिया समजून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. फसवणूक ऑनलाईन होत असल्याने आरोपी देशाच्या विविध भागासह विदेशातील असू शकतात. त्यांना हुडकून काढणे आव्हानात्मक असते. तरीही सायबर सेलला अधिक गतिमान करण्यात येईल.

– नीलेश भरणे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे.