News Flash

एका त्यागकथेची उलट-सुलट चर्चा 

नारायणराव दाभाडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. त्यांची त्यागकथा  बुधवारी समाजमाध्यमांवर वणव्यासारखी पसरली.

(संग्रहित छायाचित्र)

‘‘मी आता ८५ वर्षांचा आहे. मी माझे सर्व आयुष्य जगून घेतले. मला उपचाराची गरज नाही. माझी रुग्णशय्या तुम्ही या गरजू रुग्णाला द्या आणि त्याच्यावर उपचार करा’’, असे सांगून ते घरी परतले आणि तीन दिवसांनी देवाघरी गेले, अशा आशयाची ज्येष्ठ नागरिक नारायणराव दाभाडकर यांची त्यागकथा बुधवारी समाजमाध्यमांवर सर्वत्र पसरली. मात्र, संबंधित रुग्णालयानेच त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे.

नारायणराव दाभाडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. त्यांची त्यागकथा  बुधवारी समाजमाध्यमांवर वणव्यासारखी पसरली. वृत्त माध्यमांनीही त्याची दखल घेतली. त्यामुळे ही कथा तात्काळ ‘राष्ट्रीय बातमी’ झाली. याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ने गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीलू चिमुरकर (गंटावार) यांच्याशी  संपर्क साधला. त्यावेळी वेगळीच माहिती समोर आली.

डॉ. शीलू म्हणाल्या, ‘नारायणराव दाभाडकर यांना २२ एप्रिलच्या संध्याकाळी रुग्णवाहिकेतून येथे आणण्यात आले. ते स्वत: चालत आल्याने त्यांची प्रकृती स्थिर वाटत होती. त्यांना करोनाची लक्षणे असल्याने तातडीने रुग्णालयातील आकस्मिक विभागात दाखल केले. प्राणवायू आणि इतर औषधोपचार सुरू झाले. रात्री ७.५५ वाजताच्या दरम्यान त्यांनी रुग्णालयात राहायचे नसल्याचे सांगत  घरी जाण्याचा आग्रह धरला. तुमचे वय अधिक असून, करोनामुळे जीवाला धोका संभावतो, असे त्यांना डॉक्टरांनी सांगितले. परंतु, त्यांनी स्वत: जोखीम पत्करून रुग्णालयातून सुटी घेतली.’

‘या वेळी त्यांनी माझी खाट दुसऱ्या रुग्णाला द्या, असे काहीही सांगितले नाही. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना असे काही सांगितले असेल तर मला कल्पना नाही. त्यांच्या नातेवाईकांनीही मला याबाबत काहीही कळवलेले नाही’, असेही डॉ. शीलू यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा खाटांसाठी कोणताही गोंधळ सुरू नव्हता, असे तेथील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

माझे वडील करोनाबाधित होते. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले त्या वेळी रुग्णालयात खाट मिळावी, म्हणून गोंधळ सुरू होता. अनेक लोक रडत होते. ते पाहून माझ्या वडिलांचे मन द्रवले. माझी स्थिती नाजूक आहे, पण मला घरी जायचे आहे. माझी खाट गरजूला उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले. खूप समजावूनही मला घरी घेऊन चला, असा त्यांचा आग्रह होता. घरी आल्यानंतर दीड दिवसाने त्यांनी जगाचा निरोप घेतला. आम्हाला कोणतेही भांडवल करायचे नाही. पण त्यांनी केलेला हा त्याग समाजासाठी आदर्श आहे.

– आसावरी दाभाडकर-कोठीवान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर यांच्याबाबतीत जे घडले ते सत्य आहे. माझी खाट दुसऱ्यांना द्या, मला घरी जाऊ द्या, अशी विनंती त्यांनी रुग्णालयाला केली आणि ते घरी गेले. मात्र, दाभाडकर यांच्याबाबत समाजमाध्यमावर काही लोकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे.

– अनिल सांबरे, विदर्भ प्रांत प्रचारप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

दाभाडकर यांना इंदिरा गांधी रुग्णालयातून घरी जाऊ दिले असेल आणि त्यांच्या बाबतीत वर्तमानपत्रातील वृत्ताप्रमाणे असे काही खरेच घडले असेल तर त्यासंदर्भात चौकशी केली जाईल. रुग्णालयातील डॉक्टरांकडूनही माहिती घेतली जाईल.

– दयाशंकर तिवारी, महापौर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 12:36 am

Web Title: dabhadkar sacrifice story is questioned by the hospital itself abn 97
Next Stories
1 Coronavirus in nagpur : मृत्यू घटले, रुग्ण वाढले!
2 टाळेबंदीमुळे भूखंड निविदेस मुदतवाढ
3 लोकजागर : ‘दीपाली’च्या निमित्ताने..
Just Now!
X