25 September 2020

News Flash

दलित मतांचे विभाजन टळल्याने काँग्रेसला फायदा!

भाजपने अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तर नागपूर मतदारसंघात  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले होते.

संग्रहित छायाचित्र

|| राजेश्वर ठाकरे

रिपब्लिकन चळवळीचा एकेकाळचा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात : – बसपाला मतदान केल्यास भाजपला फायदा  होतो, हे लक्षात आल्याने आंबेडकरी मतदारांनी ठरवून काँग्रेसला मतदान केले. त्याचा फायदा नितीन राऊत यांना झाला. त्यामुळे  रिपब्लिकन चळवळीचा एकेकाळचा गड उत्तर नागपूर काँग्रेसला परत काबिज करता आला.

भाजपने अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तर नागपूर मतदारसंघात  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले होते. त्यावेळी बसपाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती. आंबेडकरी मतांचे विभाजन काँग्रेस आणि बसपामध्ये झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. गेल्या पाच वर्षांतील भाजपच्या राजवटीमुळे आंबेडकरी समाज दुखावला गेला. दलित मतांचे विभाजनच भाजपला पोषक ठरले ही खंत या भागात लोकसभेच्या निवडणुकीपासूनच होती. त्यामुळे या निवडणुकीतही या भागात भाजपला फटका बसला होता. या मतदारसंघात नितीन गडकरी यांनाही काँग्रेसपेक्षा ८ हजार ९१० मते कमी मिळाली होती. मतदारांनी तोच कल विधानसभेत देखील कायम ठेवला. त्यामुळे यावेळी काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले. बसपा उमेदवाराला मागच्या निवडणुकीपेक्षा कमी मिळालेली मते हीच बाब अधोरेखित करते. बसपाला कॅडर मतांव्यतिरिक्त इतर मतदारांनी अव्हेरले.

बहुजन समाज पार्टीने महाराष्ट्रात खाते उघडण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांना मैदानात उतरवले होते. राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी खुद्द इंदोरा येथील ऐतिहासिक पटांगणावर प्रचार सभा घेतली. यात त्यांनी आंबेडकरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी धर्मातराचा  पुनरुच्चार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकादेखील केली. त्यामुळे काँग्रेससमोर बसपाचे आव्हान उभे होईल, असे वाटत होते. मात्र, राजकीयदृष्टय़ा जागृत उत्तर नागपूरच्या मतदारांनी भाजपला पराभूत करण्यासाठीच मतदान केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

डॉ. नितीन राऊत यांचा मंत्रीपदाच्या कार्यकाळात जनसंपर्क तुटला होता. परंतु गेल्या पाच वर्षांत त्यांनी ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य मतदारांसोबत समाजातील बुद्धिजीवींच्या ते संपर्कात राहिले. त्याचा लाभ त्यांना या निवडणुकीत झाला. तर डॉ. मिलिंद माने यांच्यावर निष्क्रियतेचा बसलेला शिक्का कायम राहिला आणि त्याचा त्यांना फटका बसला.

मिळालेली मते

  • काँग्रेस- ८६८२१
  • भाजप- ६६१२७
  • बसप- २३३३३
  • वंचित बहुजन आघाडी – ५५९९
  • एमआयएम – ९३१८
  • नोटा झ्र् १९८६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 2:47 am

Web Title: dalit votes congress akp 94
Next Stories
1 १५ टक्के नागरिकांची गृहकराला ‘ना’
2 अवकाळी पावसामुळे दिवाळीच्या उत्साहावर विरजण
3 ठाकरे, पारवेंसह १६ उमेदवार पहिल्यांदा विधानसभेत
Just Now!
X