तातडीने पंचनामे करण्याचे  केदार यांचे आदेश

नागपूर : अवकाळी पावसामुळे जिल्ह्य़ातील सालई आणि नांदागोमुख येथील संत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून मदत देण्यात यावी, असे निर्देश पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले.

सावनेर तालुक्यातील सालई व नांदागोमुख या परिसरातअवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या संत्री बागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मंत्री सुनील केदार यांनी सालई व नांदागोमुख येथील नुकसानीचा आढावा घेण्याकरिता स्वत: शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर रविवारी भेट घेतली.

यावेळी प्रमुख रूपाने नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, त्याचप्रमाणे महसूल विभाग, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आधीच करोनासारख्या महामारीमुळे समस्त देश त्राही त्राही झाला आहे. कुठेतरी कृषी क्षेत्राने या देशाची अर्थव्यवस्था सांभाळली असता अवकाळी पावसाने मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे. तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश प्रशासनाला केदार यांनी दिले. यावेळी केदार यांनी शेतीसोबतच वादळामुळे नुकसान झालेल्या घरांना सुद्धा भेट दिली. प्रशासनाला तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंबंधी निर्देश दिले.

फळबागांसोबतच फुलबागांनाही अनुदान

मागेल त्याच्या हाताला काम देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनरेगा योजनेतून फळबाग लागवडीसोबतच आता फुलांची  लागवडही केली जाणार आहे. विशेष म्हणजे, फुलबागांसाठी सरकार शंभर टक्के अनुदान देणार असल्याने याचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कृषी विभागामार्फत फळबाग लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जात होता.पण मागील वर्षांपासून यात फुलांच्या बागांचासही समावेश करण्यात आला. पहिल्या वर्षांत योजनेविषयी अनेकांना माहिती नव्हती. पण यावर्षीपासून जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा म्हणून कृषी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. १०० टक्के अनुदानावर ही योजना असल्याने लाभार्थ्यांवरील आर्थिक भारही कमी होणार आहे. फुलांचे रोप कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसेच खासगी रोपवाटिकेमधून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. खरेदीची पावती कृषी विभागाने प्रमाणित केल्यावर त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.या कार्यक्रमासाठी पूर्वहंगामी मशागत करणे ,खड्डे खोदणे, झाडांची लागवड करणे, पाणी देणे, आंतरमशागत, औषध फवारणी व झाडाचे संरक्षण करणे ही कामे लाभधारकांनी स्वत: जॉबकार्डधारक मजुरांकडून करून घेणे आवश्यक असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक प्रज्ञा गोडघाटे यांनी कळवले आहे.