पोलिसांच्या आकडेवारीचा निष्कर्ष

सिमेंट रस्ते, मेट्रोच्या खोदकामांमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात वाढले, अशी ओरडही होत आहे. मात्र, पोलिसांच्या नोंदीनुसार शहरातील अपघात व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. या आकडेवारीमुळे नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र ती खरी माहिती आहे.

शहराच्या चारही दिशेने सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. सोबतच खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक आणि हिंगणा ते पारडी या दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्याशिवाय उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) बांधकाम, महापालिका, ओसीडब्ल्यू, महावितरणची वेगवेगळी कामे शहरात सुरू आहेत. सर्व प्रमुख रस्त्यांची दैना झाली आहे. मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी ही सार्वत्रिक समस्या झाली आहे. या अवस्थेमुळे अपघात वाढल्याची ओरड होत आहे, परंतु गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीशी तुलना केली तर अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आकडेवारीनुसार  २०१६ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबपर्यंत २१९ अपघात झाले होते. यंदा ही संख्या १७७ आहे. (४२ ने कमी) तर याच काळात २३४ लोकांचा अपघाती मृत्यू झाला होता. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान ही संख्या १८४ आहे. (मागील वर्षीच्या तुलनेत ५० ने कमी) अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होणे, ही बाब समाधानकारक असली तरी हे यश वाहतूक पोलिसांचे आहे की किरकोळ अपघात पोलीस ठाण्यात पोहोचतच नसल्याने, त्याची नोंद होत नसल्याने प्रमाण कमी झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर वाढला

मारुती सुझुकीने देशातील १७ शहरांत केलेल्या सर्वेक्षणात ‘सीटबेल्ट’ लावून वाहन चालवणाऱ्यांचे सर्वाधिक ८९ टक्के प्रमाण नागपुरात आढळून आले. जयपूरमध्ये हे प्रमाण ८७ टक्के, चंदीगडमध्ये ८२ टक्के आहे. देशात नागपूरचा पहिला क्रमांक आहे. हेल्मेट वापरण्यातही नागपूर अग्रस्थानी (९१ टक्के)आहे.

श्रेय नागपूरकरांना

शहराच्या चौकाचौकात वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत. शिवाय हेल्मेटचाही वापर शहरात मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. वाहन कंपनीच्या सर्वेक्षणात सीटबेल्ट लावून कार चालवण्याचे सर्वाधिक प्रमाण नागपूरचे आहे. याचे श्रेय नागपूरकरांना जाते. सीटबेल्ट लावणे व हेल्मेट घालून वाहन चालविण्यामुळेच अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण कमी झाले.

रवींद्र परदेशी, वाहतूक पोलीस उपायुक्त