नागपुरातील घटना : पाच मुलींच्या हातापायाला गंभीर दुखापत

योग्यप्रकारे नृत्य करता न आल्याने एका नृत्य शिक्षकाने १७ विद्यार्थिनींना लोखंडी दांडय़ाने अमानुष मारहाण केली. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सुयश कॉन्व्हेंटमध्ये घडली. यात पाच मुलींच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही शाळा काँग्रेसचे नगरसेवक संजय मधुकरराव महाकाळकर यांची आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या शाळेमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यात वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. यंदाही स्नेहसंमेलन आयोजित करण्याच्या दृष्टीने मुलांकडून सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करवून घेतली जात होती. त्यासाठी मुलांना नृत्य शिकविण्यासाठी मनीष राऊत (२५) रा. दिघोरी या नृत्य शिक्षकाला कंत्राटी तत्त्वावर शाळेने पाचारण केले होते. १८ नोव्हेंबरपासून शाळेच्या सभागृहात नृत्याचे वर्ग सुरू झाले आहेत. सकाळी ८.३० ते २.३० या वेळेत शाळा भरत असून त्यादरम्यान विद्यार्थ्यांना नृत्यही शिकविण्यात येते. बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास सातवीच्या वर्गातील १७ विद्यार्थिनींचा समूह हा राजस्थानी नृत्य शिकण्याकरिता मनीष राऊतच्या मार्गदर्शनात सराव करीत होता. त्यावेळी काही मुलींचे नृत्य चुकले. या रागात त्याने सभागृहाच्या कोपऱ्यातील झाडूच्या लोखंडी दांडय़ाने विद्यार्थिनींच्या हाता व पायावर अमानुषपणे मारहाण केली. यात पाच विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्यांच्या हातापायाची हाडे मोडल्याचा आरोप पालकांनी केला आहे, तर मुलींना गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

नृत्य शिक्षक जवळपास अर्धा तास विद्यार्थिनींना मारहाण करीत होता. काही वेळाने शाळेतील एक महिला शिक्षिका सभागृहाच्या दिशेने गेली असता त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर मुलींची सुटका करण्यात आली. काही मुली घरी गेल्या आणि आईवडिलांना सर्व प्रकार सांगितला.  त्यानंतर जखमी मुलींना मोठा ताजबाग परिसरातील समर्पण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर मुलींना उंटखानातील निरामय रुग्णालयात हलविण्यात आले. लक्ष्मी मनोज आकरे, ऐश्वर्या व्यंकटेश बेलमकोंडा, प्राची राजेंद्र खंदाडे, तनुश्री सुनील वाडे आणि प्रज्योक्ती हिरालाल मांडवकर यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. नितीका लांबट, पलक जयस्वाल, मृदूल, राधा भंडारकर, दीक्षा मेश्राम, सुष्मा आडे, समृद्धी आडे आणि पाच मुलींना इतर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलींच्या अंगावर वळ असून गेल्या आठ दिवसांपासून तो मुलींना विविधप्रकारे त्रास देत होता. मुलींचे पालक राजेंद्र खंदाडे, सोनाली बेलमकोंडा यांनी शिक्षक व प्राचार्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाच्या कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी मनीष राऊतला ताब्यात घेतले आहे.

विद्यार्थिनींना झालेली मारहाण हा अतिशय गंभीर प्रकार असून शाळा व्यवस्थापन मुलींसोबत आहे. संबंधित नृत्य शिक्षकाला स्नेहसंमेलनाच्या तयारीकरिता पाचारण करण्यात आले होते. त्याच्या कृत्यासाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि मुलींच्या पालकांसोबत चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.  संजय महाकाळकर नगरसेवक, शाळा संचालक.