18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

धोकादायक वळण रस्ते अपघाताला कारणीभूत

मानकापूरकडून पागलखान चौकाकडे येत असताना रस्त्याच्या मधोमध मोठमोठी झाडे आहेत.

मंगेश राऊत, नागपूर | Updated: October 12, 2017 1:34 AM

मानकापूर चौकात सिग्नल नसून रिंगरोड असल्याने जड वाहतूक सुरू असते. शिवाय उड्डाणपुलामुळे खालून वाहतूक करणाऱ्यांना दुसऱ्या रस्त्याने येणारी वाहने दिसत नाहीत.

पश्चिम नागपुरातील अनेक रस्त्यांवर अपघाताचे सापळे

पश्चिम नागपुरातील अनेक रस्त्यांवरील वळण धोकादायक आहे, तर दोन रस्त्यांना जोडणाऱ्या मार्गाना आंधळे वळण असल्याने त्या ठिकाणी मृत्यूचे सापळे तयार झाले आहे. त्यामुळे वाहनांचा वेग आणि नियंत्रण सुटल्यानंतर त्या ठिकाणी अपघात होतात आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

नागपूर शहरात ३६ अपघात स्थळ आहेत. या अपघात स्थळांचा प्रादेशिक परिवहन विभाग, नागपूर पोलीस यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी गेल्या तीन वर्षांत अनेक अपघात स्थळांवर झालेल्या अपघातांमध्ये लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. त्यापैकी पश्चिम नागपुरात पागलखाना चौक, काटोल रोड, राजभवन प्रवेशद्वार (मागील बाजू), एलएडी चौक (व्हेटरनरी कॉलेज) आणि एलआयसी चौकही अपघातप्रवण स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मानकापूर चौक हा रिंगरोडवर आहे. आता त्या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात आले. त्यामुळे बहुतांशवेळ चौकातील सिग्नल्स बंद असतात. या चौकात दुचाकीची वाहतूक ६० टक्के आहे, तर रिंगरोडमुळे जड वाहनांसोबत भोपाळ, काटोल, जबलपूर आणि नागपूर अशा चारही बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनांची गती जास्त असते. सिग्नल बंद असल्याने वाहनांची गती कमी होत नाही आणि उड्डाणपूल व इमारत बांधकामांमुळे समोरून व बाजूने जाणारी वाहने दृष्टीस पडत नाही आणि अपघात होतात.

मानकापूरकडून पागलखान चौकाकडे येत असताना रस्त्याच्या मधोमध मोठमोठी झाडे आहेत. रस्ता चौपदरी असल्याने वाहने भरधाव वेगाने चालतात आणि लक्ष विचलित झाल्यानंतर झाडावर आदळून अपघात होण्याचे प्रमाण बरेच आहे. त्याशिवाय पागलखाना चौकात वाहतूक पोलीस कमी राहात असल्याने सिग्नल तोडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेही अपघाताला चालना मिळते. नवीन काटोल नाका चौकातून रस्ता रिंगरोडकडे जात असून त्या ठिकाणी जड वाहतूक मोठय़ा प्रमाणात आहेत. काही भाग टेकडीचा व उताराचा असल्याने वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होतात.

राजभवनचे मागील प्रवेशद्वार मोठे अपघातस्थळ ठरले आहे. या चौकाच्या मधोमध खुली जागा असून तेथे उद्यानासाठी जागा सोडण्यात आली आहे. तेथून एक रस्ता सदर, दुसरा जपानी गार्डन, तिसरा जुना काटोल नाका आणि चौथा सेमिनरी हिल्सकडे जातो. रस्त्याची रचना अतिशय विचित्र असून चारही बाजूची वाहने एकाचवेळी परस्परांना भेदतात. शिवाय चौकाच्या मधोमध वृक्ष असल्याने सेमिनरी हिल्सवरून उतरणारी वाहने दिसत नाहीत, तर जपानी गार्डनकडून काटोल नाक्याकडे जाणारी वाहने भरधाव असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. जपानी गार्डनकडून जुना काटोल नाका चौकाकडे जात असताना रस्ता अतिशय वणळाचा आणि उताराचा आहे.

त्यामुळे वाहनांची गती जास्त असते व धोकादायक वळणावर दुचाकी घसरून पडण्याची शक्यता निर्माण होते. सेमिनरी हिल्सवरील पशुवैद्यक महाविद्यालय परिसरातील एलएडी चौक हा आंधळया रस्त्यांनी जोडलेला आहे. त्या चौकातून एक रस्ता हजारीपहाड आणि दुसरा रस्ता फ्रेंन्ड्स कॉलनीकडे जातो. दोन्ही रस्ते टेकडीवरून उतरतात. त्यामुळे खालून येणारी वाहने वायुसेनानगरकडून येणाऱ्यांना दिसत नाही आणि वरून जाणारी वाहने खालच्यांना बघण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे चौकात वाहनांची गती अधिक असल्यास अपघाताचा धोका संभवतो. तर एलआयसी चौकात बस आणि ऑटो स्टँड आहे. त्यामुळे चौकातच वाहने उभी केली जातात. म्हणून तेथे अपघात होतात. या चौकात काही महिन्यांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता. हे विशेष.

उपाययोजनेसाठी लाखो रुपयांची गरज

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इंटरनॅशनल रोड फेडरेशन, इंडिया चॅप्टरच्या वतीने नागपुरातील २४ अपघातप्रवण स्थळांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यावेळी मानकापूर चौकातील अपघातप्रवण स्थळ हटवण्यासाठी ६ लाख ८१ हजार, ७६९ आणि काटोल नाक्याकरिता १९ लाख, ५७ हजार, ७६९ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे नमूद होते. त्यानंतर अहवालाचे काय झाले, हा प्रश्न कायम आहे.

गतिरोधकामुळे अपघाताचे प्रमाण कमी

सेमिनरी हिल्स एलएडी चौकात पूर्वी अपघाताचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता प्रशासनाने सर्व रस्त्यांवर चौकाच्या पूर्वी गतिरोधक लावले आहेत. त्यामुळे चौकात वाहनांची गती कमी होत असल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, काही गतिरोधक उखडले असून ते पुन्हा लावण्याची आवश्यकता आहे.

राजेश बागडे, चौकात चहाठेला चालवतो.

वाहतूक पोलीस असावेत

उच्च न्यायालयात जाण्यासाठी काटोल नाका चौक ते राजभवन मार्गाचा वापर केला जातो. मात्र, सकाळच्या सुमारास वाहनांची प्रचंड गर्दी असते. शिवाय परिसरात सेंटर पॉईंट स्कूल असून त्या ठिकाणी येणारी वाहने रस्त्यांवर उभी केली जातात. सकाळी व सायंकाळी परतताना भरधाव वेगाने चालविली जातात आणि राजभवन चौकात चारही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे राजभवन चौकात वाहतूक पोलीस असावेत.

अ‍ॅड. होमेश चौहान

First Published on October 12, 2017 1:34 am

Web Title: dangerous road turn in nagpur accidents issue nagpur