छोटे व्यापारी, व्यावसायिकांना उपयुक्त ठरणारे अ‍ॅप नागपूरच्या तरुणाकडून विकसित

मोठमोठय़ा कंपन्यांकडे त्यांच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी कुशल मनुष्यबळ असते. छोटे व्यापारी किंवा दुकानदारांना असे कुशल मनुष्यबळ ठेवता येतेच असे नाही. त्यांच्यासमोरील हा प्रश्न सोडवण्यासाठी नागपुरातील एका तरुणाने अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे.

जगात सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणाऱ्या मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, आयबीएम, ओरॅकल, फेसबुक, टेनसेन्ट, सॅप, अ‍ॅक्सेन्चर, टीसीएस आणि बैदू या १० आघाडीच्या कंपन्या आहेत. पूर्वी ज्याच्याकडे तेलावर नियंत्रण तो देश जगावर राज्य गाजवत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. जो देश माहिती तंत्रज्ञानात आघाडीवर आहे, त्याची चलती आहे. जगातच नव्हे तर देशातही अशा अवाढव्य कंपन्या आहेत की त्यांच्याकडील वस्तूरूपी यादी कशी लक्षात ठेवावी, हे आव्हान आहे. मात्र, डाटा व्यवस्थापन करणाऱ्या अभियंत्यांमुळे हे प्रश्न चुटकीसरशी सुटतात. मात्र, लहान शहरात व्यवसाय करणाऱ्यांना तासन्तास ही आकडेमोड करावी लागते.

वस्तूंची तपशीलवार यादी करून किती माल आणला, खप, वाया गेलेला, शिल्लक, कोणती वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरली, कोणता रंग ग्राहकांना आवडला, कोणता नाही याची इत्थंभूत माहितीचा हिशेब करून शेवटी एकूण आकडा सांगणारे असेल तर लहान दुकानदारांना त्याच्या व्यवसायातून जास्त नफा बनवता येईल, या उदात्त हेतूने अक्षय झाडगावकर या संगणक तज्ज्ञाने असे अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे.

अमेझॉनसारखी परदेशी किंवा देशांतर्गत बिग बाजारसारख्या कंपन्यांकडे प्रचंड माल येतो. मात्र, त्याचा हिशेब ठेवण्यासाठी त्यांना आकडेमोड करावी लागत नाही. कारण पैसा भरपूर असतो आणि एक दोन नव्हे तर अनेक सॉफ्टवेअर अभियंते त्यांच्याकडे काम करीत असतात. मात्र, जे स्थानिक अर्थव्यवस्था चालवतात असे किराणा दुकानदार, कपडय़ाचे व्यापारी, पेंट, इलेक्ट्रीकल्सचे दुकानदार, मोबाईल दुकानदार, शाळा यांना देखील त्यांच्या वस्तूंची यादी सॉफ्टवेअरच्या एका क्लिकवर कळू शकते. त्यातून त्यांना जास्त फायदा होऊ शकतो.   – अक्षय झाडगावकर, सॉफ्टवेअर तज्ज्ञ

एखादी गृहिणी लोणच्याचा व्यवसाय करते. तिचा व्यवसाय वाढायला लागतो. विस्तारामुळे  व्यवसायावर अपुरे लक्ष आणि वस्तूंचा हिशेब ठेवताना होणारी दमछाक यामुळे गुणवत्ता घसरली असे ऐकायला मिळते. हे त्यामुळेच. त्यापेक्षा वस्तूचा हिशेब ठेवणारे सॉफ्टवेअरने मेहनत वाचते आणि उर्वरित वेळ चांगल्याप्रकारे व्यवसायाला देता येतो.