खासगी रुग्णालयतील अत्यवस्थ करोना रुग्णाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यासाठी ताटकळत ठेवल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला. या रुग्णाचा खासगी प्रयोगशाळेचा चाचणी अहवाल सकारात्मक तर मेयोतील अहवाल नकारात्मक आल्याने त्यांचा संताप जास्तच वाढला.

श्रीकांत देशमुख (५२) रा. बजेरिया असे दगावलेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांची प्रकृती ३ दिवसांपूर्वी खालवली. त्यांना  सिंगा या खासगी रुग्णालयात दाखल केले.  त्यांची प्रकृती जास्तच खालावल्यामुळे  त्यांचे नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले गेले. त्यांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाल्याने व्हेंटिलेटर लावण्यात आले.   जास्त पैसे नसल्याने  नातेवाईक मेयो रुग्णालयात  गेले. पाऊस सुरू असतांनाही त्यांना रुग्णालयाबाहेर रात्री १०.३० वाजेपर्यंत ताटकळत ठेवले गेले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी बोलावले. रुग्णाला दाखल करण्याची शाश्वती मिळाल्यावर त्यांनी रात्री १२ वाजता रुग्णाला मेयो रुग्णालयात हलवले.   रुग्ण व्हेंटिलेटरवर असतांनाही त्याला तब्बल ३० मिनिटे  दाखल करण्यासाठी ताटकळत ठेवले गेले. श्वास थांबत असल्याचे बघत नातेवाईक संतापले. त्यानंतर मेयोच्या डॉक्टरने आत नेऊन तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. डॉक्टरांनी दाखल करण्यासाठी ताटकळत ठेवल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला.  मृताचे नमुने  तपासणीला पाठवले. त्यातच खासगी प्रयोगशाळेचा अहवाल सकारात्मक तर मेयोचा नकारात्मक आला. त्यामुळे मृतदेह महापालिकेच्या माध्यमातून नातेवाईकांना देण्याच्या विषयावर नातेवाईक संतापले.  अधिष्ठात्यांनी खासगी रुग्णालयात रुग्ण नेण्याचा सल्ला दिल्याचा आरोपही नातेवाईक मंगेश कांबळी यांनी केला.

मेयो प्रशासनाने आरोप फेटाळले

खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ रुग्ण मेयो रुग्णालयात आणतांना पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. ती न देता रुग्णाला व्हेंटिलेटरवर आणले गेले. त्याचा करोना अहवाल नसल्याने त्याला कुठे ठेवावे याचे तातडीने नियोजन करत त्याला तपासणीसाठी घेण्यात आले. वॉर्डात हलवताना त्याचा मृत्यू झाला . त्याचा मेयोतील अहवाल नकारात्मक असला तरी खासगीचा अहवाल सकारात्मक असल्याने महापालिकेच्या माध्यमातून मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांना सोपवण्यात आले. यात मेयो प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा प्रश्नच येत नाही, असे मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया म्हणाले.

२४ तासात ३३ मृत्यू, ९२१ बाधितांची भर

* करोनामुळे २४ तासांत ३३ मृत्यू झाले असून आजपर्यंतच्या बळींची संख्या एक हजारच्या (९२१) उंबरठय़ावर पोहोचली आहे.  दिवसभऱ्यात जिल्ह्य़ात नवीन ९२१ बाधितांची भर पडल्याने आजपर्यंतच्या बाधितांची संख्याही २७ हजार पार गेली आहे.

* दिवसभऱ्यात दगावलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २७ तर ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे.  जिल्ह्य़ाबाहेरीलही २ मृत्यू झाल्याने २४ तासातील मृत्यूंची संख्या ३३ वर पोहोचली आहे.   शहरात शनिवारी  ६४३ आणि ग्रामीण भागात २७६ नवीन बाधित आढळले.  नवीन बाधितांमुळे  बाधितांची संख्या थेट २० हजार ६८७ वर, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ६,०५१ जिल्ह्य़ाबाहेरील रुग्णसंख्या २७७ अशी एकूण २७ हजार १५ वर  पोहचली आहे.

१,११२ करोनामुक्त

येथील शहरी भागात दिवसभऱ्यात ९२६ तर ग्रामीण भागात १८६ असे एकूण १,११२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्याही आता थेट सतरा हजारच्या उंबरठय़ावर (१६,९६७ रूग्ण) आली आहे. त्यात शहरातील १२ हजार ४७९ तर ग्रामीण भागातील ४,४८८ जणांचा समावेश आहे.

सक्रिय रुग्णांची संक्या नऊ हजार पार

शहरी भागात ६,८४२ तर ग्रामीण भागात २,२२७ असे एकूण ९ हजार ६९ रुग्ण सक्रिय आहेत. पैकी तब्बल ६ हजार रुग्ण गृह विलगरणात उपचार घेत आहेत. २,१४८ रुग्णांवर येथील शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

मेयोतील बधिरीकरण विभागाचे तज्ज्ञ काय करतात?

मेयो रुग्णालयातील मृत्यू कमी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याने पुण्याहून १ बधिरीकरणशास्त्र विभागातल तज्ज्ञ तर एक औषधशास्त्र विभागातील तज्ज्ञ पाठवला आहे.  दरम्यान मेयोच्या बधिरीकरणशास्त्र विभागात तब्बल  पाच सहयोगी प्राध्यापक कार्यरत आहेत. परंतु त्यातील काहींना कोव्हिड वार्डात कुणीही बघितले नसल्याची चर्चा  मेयोच्या अधिकाऱ्यांत आहे. येथील कोव्हिड रुग्णालय सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात आल्याने येथील अनेक शस्त्रक्रिया विभाग बंद आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण मेडिकलमध्ये पाठवले जात आहे. त्यामुळे या बधिरीकरण शास्त्र विभागातील तज्ज्ञांना प्रशासन काय काम देते हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

करोना नियंत्रणासाठी धारावी, कोळीवाडाच्या धर्तीवर नियोजन

मुंबईतील धारावी व कोळीवाडासह इतर भागातील करोनाचा प्रकोप रोखणाऱ्या तज्ज्ञांची समिती ४ सप्टेंबरला नागपूरला येणार आहे. येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत आढावा घेऊन आजार नियंत्रणावर नियोजन केले जाईल. सध्या नागपुरात बधितांची संख्या वाढत असल्याने त्याचा जिल्ह्याला लाभ होईल, अशी महिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या समितीत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल, डॉ. ओम श्रीवास्तव (संक्रमणक रोग विशेषज्ज्ञ), डॉ राहुल पंडित (गंभीर रोग विशेषज्ज्ञ), डॉ. मुफझल लकडावाला (जनरल सर्जन), डॉ गौरव चतुर्वेदी (कान नाक घसा विशेषज्ज्ञ ) यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती  अनिल देशमुख यांनी दिली. मुंबई येथील हॉटस्पॉट ठरलेल्या कोळीवाडा व धारावी मुंबईचा इतर भागात  मोठय़ा प्रमाणात कोरोनाचे रुग्ण निघत होते. परंतु आता येथील परिस्थिती अगदी सामान्य झाली आहे. त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षाही जास्त आता नागपूर शहरात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.  स्थानिक प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचे काम करीत आहे.

नातेवाईकच मृतांचे स्ट्रेचर ओढतात

मेयो आणि मेडिकलमध्ये काही नातेवाईकांना मृत बाधितांचे स्ट्रेचर ओढावे लागल्याची तक्रार काही संघटना करत आहेत. या प्रकाराने संक्रमणाचा धोका  वाढत  आहे. मात्र मेडिकल आणि मेयो प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहे.