News Flash

निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशीचा निर्णय

मुंबई पोलिसांच्या कृत्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले होते.

  • गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
  • परमबीर सिंग आरोप प्रकरण

 

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्याविरुद्ध १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपींची चौकशी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींमार्फत करण्याची मागणी मी स्वत: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. त्यांनीही सेवानिवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून सत्य बाहेर येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांच्या कृत्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले होते. त्यामुळे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. बदली होताच सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना मुंबईतून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट केला. या आरोपानंतर गृहमंत्री  देशमुख यांच्यावर चहूबाजूने टीका होत असून विरोधी पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देशमुख यांच्या पाठीशी असल्याचे दिसते. रविवारी  देशमुख हे आपल्या गृह शहरात परतले असता  विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, परमबीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींमार्फत करण्याची मागणी मी  मुख्यमंत्र्यांना केली. त्यानुसार त्यांनी सेवानिवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याचा निर्णय घेतला.  सत्यता समोर येईल, असे म्हणाले.  ‘सामना’ तून केलेल्या टीकेसंदर्भात त्यांनी बोलणे टाळले.

देशमुख जाणार की राहणार?

मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी होत असेल तर संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो. महाराष्ट्रात याच कारणांवरून यापूवी अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. युती शासनाच्या यापूर्वीच्या शासन काळात तत्कालीन मंत्री महादेव शिवणकर आणि शोभा फडणवीस यांना तर मागच्या कार्यकाळात एकनाथ खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का? याकडे लक्ष लागले आहे. आता तर सेनेच्या मुखपत्रातूनही देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली आहे. हे येथे विशेष.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 1:59 am

Web Title: decision of inquiry by retired judges akp 94
Next Stories
1 दीपाली चव्हाण प्रकरणात स्वयंसेवींची चुप्पी
2 बस-पिकअप व्हॅनच्या धडकेत चार ठार
3 विदर्भात  तापमान वाढले
Just Now!
X