पांढरकवडय़ातील गोळी घालून ठार केलेल्या टी-१(अवनी) वाघिणीच्या उपप्रौढ बछडय़ाला जंगलात सोडण्याच्या हालचाली वनखात्याकडून सुरू झाल्या आहेत. तसा तत्त्वत: निर्णय झाला असून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून परवानगीची प्रतीक्षा आहे. अवनीच्या मृत्यूनंतर तिच्या मादी बछडय़ाला वनखात्याने जेरबंद केले होते. तेव्हापासून ही वाघीण पेंच व्याघ्रप्रकल्पातील खुल्या पिंजऱ्यात आहे.

१३ लोकांना ठार मारल्याचा ठपका ठेवल्यानंतर टी-१ वाघिणीला नोव्हेंबर २०१८ मध्ये गोळी घालून ठार करण्यात आले. त्यानंतर सुमारे महिनाभराने तिच्या दीड वर्षे वयाच्या मादी बछडय़ाला जेरबंद करण्यात आले. डिसेंबर २०१८ पासून पेंच व्याघ्रप्रकल्पातील साडेचार हेक्टरच्या खुल्या पिंजऱ्यात तिचे वास्तव्य आहे. आता अडीच वर्षे वयाची असलेली ही वाघीण जंगलात सोडण्याबाबत वनखात्याच्या हालचाली सुरू आहेत. मागील वर्षीदेखील तिला सोडण्याबाबतचा निर्णय झाला होता, पण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या काही मार्गदर्शक सूचना आणि इतर काही गोष्टी जुळून आल्या नाहीत. अवघ्या दीड वर्षे वयाच्या या वाघिणीला त्यावेळी जंगलात सोडणे शक्यही नव्हते. दरम्यान, ही वाघीण आता सुदृढ असून जंगलात सोडल्यानंतर ती शिकार करू शकते, अशी खात्री वनखात्याला आहे. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या परवानगीनंतरच तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाऊ शकते. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे लवकरच पाठवण्यात येणार आहे. खुल्या पिंजऱ्यात सोडल्यापासूनच तिच्या  वर्तणुकीवर लक्ष ठेवले जात आहे. प्राधिकरणाच्या मानक कार्यप्रणालीनुसार सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर, पावसाळा संपल्यावर वाघिणीला सोडण्याची तयारी केली जाईल.

टी-१सी-२ या अडीच वर्षे वयाच्या वाघिणीला जंगलात सोडण्याबाबत तत्त्वत: निर्णय झाला आहे. याबाबत वनखात्याचे अधिकारी, भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक व संबंधितांची बैठक नुकतीच पार पडली. या निर्णयानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. परवानगी मिळाल्यानंतर आणि पावसाळा संपल्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल. तिला कुठे सोडायचे याबाबत देखील विचार करण्यात येईल.

– नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव).