रेशन दुकानातून धान्यवाटपात होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी करण्यात आलेल्या संगणकीकरणामुळे २०२० या वर्षांत राज्यभरात धान्य उचलीत ७ हजार मे.टनने घट झाली आहे. ताज्या आर्थिक पाहणी अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

नव्या प्रक्रियेत स्वस्त धान्य दुकानातील वाटप हे ‘पॉइंट ऑफ सेल’ या उपकरणाच्या माध्यमातून केले जाते. या प्रक्रियेमुळे गैरप्रकाराला आळा बसत असला तरी अनेकदा इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने आणि तांत्रिक बिघाडामुळेही गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आर्थिक पाहणी अहवालानुसार सार्वजनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण योजनेत २०२०-२१ या वर्षांत राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातील १५६.६३ लाख शिधापत्रिकाधारकांपैकी १५३.१२ लाख शिधापत्रिकांची आधार जोडणी जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण झाली. राज्यातील ५२ हजार ५३२ दुकानांमधून धान्याचे वाटप ‘पॉइंट ऑफ सेल’ उपकरणाच्या माध्यमातून सुरू झाले. वर्षभरात राज्यात ७.५३ हजार मे. टन धान्य उचलीत घट झाली, असे २०२०-२१ च्या पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.