उच्चशिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाणही कमी

तंत्रज्ञानाचा वापर करून केजी टू पीजी शिक्षण सहज, सुलभ आणि सर्वाना मिळावे, हा स्मार्ट सिटी बनवण्यामागील मुख्य उद्देश आहे. हे करतानाच शिक्षणातील शिखर संस्था असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाला उच्चशिक्षणातील टक्का वाढवणेही अपेक्षित आहे. कारण, सध्याचा उच्चशिक्षणातील भारताचे एकूण नोंदणी प्रमाण (जीईआर) २३ टक्के आहे. ती ३० टक्क्यांपर्यंत करण्याचे युजीसीचे १२ व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे. त्याबाबतीत आपल्यापेक्षा चीन पुढे आहे. अवाढव्य लोकसंख्या असूनही त्यांचा जीईआर ४० टक्के आहे.

चार कृषी आणि अकृषी विद्यापीठांची मुख्यालये विदर्भात असून राज्यात सर्वाधिक विद्यार्थी नागपूर विद्यापीठात आहेत. एकूण ४ लाख विद्यार्थी नागपूर विद्यापीठाचे विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यापैकी २ लाख ६० हजार नियमित विद्यार्थी असून १ लाख ४० हजार माजी विद्यार्थी आहेत. यावरूनच विद्यापीठाचा व्याप लक्षात येतो. तरी गोंडवाना विद्यापीठ विभक्त झाल्याने तेवढा व्याप कमी झाला आहे. सध्या नागपूर विद्यापीठात ३८ विभाग असून त्यात बौद्ध अध्ययन केंद्र आणि रोबोटिक्स या दोन विभागांची यंदाच भर पडली आहे. विद्यापीठाशी संलग्नित ६६७ महाविद्यालये आहेत. त्यातील अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांअभावी बंद असली तरी शहरात ४०० महाविद्यालये आहेत. नागपूर विद्यापीठाची मर्यादा चार जिल्ह्य़ांपुरताच असली तरी राज्यातील इतर कोणत्याही विद्यापीठाच्या तुलनेत नागपूर विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचा लोंढा मोठा आहे. एकतर विदर्भात असलेली शैक्षणिक जाण आणि उपराजधानीत शिक्षण घेण्याचे विद्यार्थ्यांना असलेले वेड, यामुळेही नागपुरात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा मोठा आहे. त्यातल्या त्यात जाणीवपूर्वक पारंपरिक शिक्षण घेणारा विद्यार्थी मोजकाच आहे. त्यातही विद्यापीठाचे वसतिगृह मिळवणे, ग्रंथालयाची सुविधा घेता यावी म्हणूनही पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान, समाजविज्ञान, विधि, शिक्षण या विद्याशाखांना प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत.

मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमांकडेच विद्यार्थ्यांचा ओघ जास्त असतो. विद्यार्थी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन, स्थापत्यशास्त्र, औषधनिर्माणविज्ञान शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग या अभ्यासक्रमांकडे जास्त संख्येने वळतात. जरी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा दिवसेंदिवस रिक्त राहत असल्या तरी नोकरी मिळण्याची शक्यता या अभ्यासक्रमांमुळे वाढते.

नेत्यांची महाविद्यालये उंच टेकडय़ांवर नेऊन ठेवलेली आहेत. नागपूरच्या सीमेवर असलेल्या या टेकडय़ा सर्व नेत्यांच्या घशात गेल्या असून एकाच परिसरात तीन-तीन अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्या तुलनेत ग्रामीण किंवा अनुदानित महाविद्यालयातील पायाभूत सुविधांपेक्षा उंच सुशोभित केलेल्या शहरातील इमारती ग्रामीण भागातील मुलांना आकर्षित करतात. त्यातून अशा विनापायाभूत सुविधा नसलेल्या महाविद्यालयांमधून पदवी घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी कंपन्यांच्या दृष्टीने टाकाऊ स्वरूपाचा असतो. त्याला काहीही मूलभूत माहिती नसल्याने हजारो व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी बेरोजगार दिसतात किंवा कंपनीत काम करायला गेल्यावर त्यांना व्यवसायातील साध्या साध्या गोष्टी येत नसल्याने त्यांचे पितळ उघडले पडते.

विद्यार्थ्यांना विषयाची सजगता नाही -रवींद्र महाजन

यासंदर्भात शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक रवींद्र महाजन म्हणाले, विद्यार्थ्यांना विषयाची सामान्य माहिती असते. मात्र, त्या विषयावर खोलवर शिरणे म्हणजे ‘स्पेशलाईज्ड’ होणे ते टाळतात. बायो-फिजिक्स, बायो-केमिस्टी किंवा इतरही विषयांमध्ये संगणक हा विषय असतोच, पण त्याचा विचार परीक्षेपुरताच केला जातो. त्याला विद्यार्थीही जबाबदार नसून त्यांना तसेच वातावरण मिळत असल्याने तेही एखाद्या विषयाच्या खोलात जाऊन अभ्यास करीत नाहीत