News Flash

राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात दीनदयाल थाळी उपक्रम – मुख्यमंत्री

मेडिकलमध्ये बहुतांश गरीब रुग्ण उपचाराला येत असून त्यांना दिवसभर विविध चाचण्यांकरिता थांबावे लागते.

दीनदयाल थाळीचा स्वाद घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी

‘मेडिकल’च्या दीनदयाल थाळी प्रकल्पाचे लोकार्पण

मेडिकलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी केवळ १० रुपये देऊन मिळणाऱ्या दीनदयाल थाळी उपक्रमाचा प्रकल्प विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने राज्याच्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राबवण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार असून या संस्थेला वैद्यकीय शिक्षण विभागाकडून जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी मेडिकलमध्ये दीनदयाल थाळी उपक्रमाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी प्रामुख्याने केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार अजय संचेती, आमदार डॉ. अनिल बोंडे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे, वैद्यकीय सचिव संजय देशमुख, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, संदीप जोशी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत गरिबांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह इतर योजनेतून मोफत उपचार होत असले तरी त्यांच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्यास प्रसंगी त्यांना उपाशी झोपावे लागते. या नातेवाईकांना दीनदयाल थाळी योजनेतून आधार मिळेल. शासनाकडून राज्यभरात मोठय़ा प्रमाणात आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णांना घराजवळ मोफत उपचार उपलब्ध करून दिला जात आहे. येथे गंभीर संवर्गातील रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याची सोयही शासन करते. या रुग्णांचा डेटाबेस तयार होऊन कोणत्या भागात कोणत्या आजाराचे रुग्ण जास्त आहेत आणि त्यावर नियंत्रणाचे उपायही करणे सरकारला शक्य होईल.

नितीन गडकरी म्हणाले की, मेडिकलमध्ये बहुतांश गरीब रुग्ण उपचाराला येत असून त्यांना दिवसभर विविध चाचण्यांकरिता थांबावे लागते. त्यातील दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना काही दिवस रुग्णालयात घालवावे लागतात. रुग्णांना जेवण शासन देत असले तरी नातेवाईकांना जेवणासाठी मोठा खर्च झेपत नाही. या नातेवाईकांसाठी माफक दरात जेवण उपलब्ध करणे हे एक समाजकार्य आहे. ही थाळी मोफत देण्याची ‘युवा झेप’ प्रतिष्ठानची इच्छा होती. परंतु फुकट मिळणाऱ्या वस्तूंची किंमत नसते. त्यामुळे कमी शुल्क आकारण्याचा सल्ला आपण दिला होता. त्याअंतर्गत केवळ १० रुपयांत नातेवाईकांना जेवण मिळून सामान्यांना दिलासा मिळेल. शहरात जुने कपडे आणि पादत्राणांची नवीन बँक तयार करण्याची गरज असून त्यात दुरुस्ती करून गरिबांना ते माफक दरात उपलब्ध होणे शक्य असल्याचेही गडकरी म्हणाले. प्रास्ताविक संदीप जोशी यांनी तर आभार प्रदर्शन बंडू राऊत यांनी केले.

मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांकडूनही थाळीचा स्वाद

दीनदयाल थाळी लोकार्पण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतरांनीही सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून या थाळीचा आस्वाद घेतला. हे दृश्य उपस्थितांना सुखवणारे ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:01 am

Web Title: deendayal thali project in all medical colleges of maharashtra says cm devendra fadnavis
Next Stories
1 गुजरात निकालावरच अधिवेशनातील कामकाचाचा कल
2 छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून आनंदोत्सव साजरा करा
3 सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
Just Now!
X