वन्यजीवांच्या मृत्यूवर आकांततांडव करणारेच मौन!

नागपूर : दीपाली चव्हाण यांची आत्महत्या प्रकरणावर वनखात्यातील वरिष्ठ अधिकारी व वन्यप्राणी, पर्यावरणासाठी लढणाऱ्या अनेक संघटनांनी चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे या सर्वांच्या संवेदना बधिर झाल्यात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वन्यजीवाचा मृत्यू झाला तर शेकडोंच्या संख्येने वन्यजीवप्रेमी उदयाला येतात. त्याच वन्यजीवांच्या, जंगलाच्या संरक्षण व संवर्धनासाठी लढणाऱ्या दिवंगत दीपाली चव्हाणसाठी एकाही स्वयंसेवींनी समोर येऊ नये, यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याउलट काही स्वयंसेवी मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहात आहेत. तुलनेने इतर जिल्ह्यात मात्र दीपालीला न्याय मिळावा म्हणून अनेक संघटना आणि स्वयंसेवी समोर आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील ‘इको प्रो’ संस्थेने दीपालीला न्याय मिळावा म्हणून निदर्शने केली. नागपुरातही वनखात्याशी संबंधित संघटनांनी तिला न्याय मिळावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदने देण्यात आली. तर साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनीही हे प्रकरण लावून धरले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात एकही जण समोर आलेला नाही. याउलट या प्रकरणात आणखी ज्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी के ली जात आहे, त्यांच्या समर्थनार्थ काही जण समोर येत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात मानवी संवेदना बधीर झाल्यात का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

हे तर वनखात्याचे अपयश!

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एकू णच कारभार एककल्ली झाला आहे. या प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणतील तोच कायदा असतो. मेळघाटमध्ये जंगलराज सुरू आहे. एका महिला अधिकाऱ्याचा त्यात बळी जातो हे वनखात्याचे अपयश आहे, असे खोज या संस्थेच्या पूर्णीमा उपाध्याय म्हणाल्या.

‘इको-प्रो महिला मंच’कडून मूक निदर्शने

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात चंद्रपूर शहरात ‘इको-प्रो महिला मंच’कडून घटनेचा निषेध करीत ‘मूक निदर्शने’करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी उच्चस्तरीय समितीकडून करण्याची मागणी करण्यात आली. यात इको-प्रो महिला मंचच्या योजना धोतरे, मनीषा जयस्वाल, प्रगती मार्कन्डवार, भारती शिंदे, नीता रामटेके, अंजली अडगूरवार, मोनाली बुरडकर, कोमल राऊत सहभागी झाले होते. तसेच यावेळी इको-प्रोचे पदाधिकारी बंडू धोतरे, नितीन बुरडकर, राजू काहिलकर, अनिल अडगूरवार, आकाश घोडमारे, हेमंत बुरडकर सहभागी झाले होते.