विद्यापीठाच्या २५० परीक्षांचे निकाल जाहीर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशाला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी दिली.

करोनामुळे यंदा पदवीच्या ऑनलाईन परीक्षांना विलंब झाल्याने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा नुकत्याच पूर्ण झाल्या असून आतापर्यंत २५० परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसात सर्व परीक्षांचे निकाल जाहीर होतील, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पदवी परीक्षांचा निकाल जाहीर होताच पदव्युत्तर प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. उल्लेखनीय असे की, ८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नागपूर विद्यापीठाने ११०० अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली. यात ६३ हजार ४०० नियमित आणि ७ हजार ३७९ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा (बॅकलॉग पेपर) समावेश होता. यावर्षी करोना संसर्गामुळे नागपूर विद्यापीठाने आरटीएमएनयू परीक्षा अ‍ॅपवर ही ऑनलाईन परीक्षा घेतली. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले गेले. विद्यार्थ्यांना ५० पैकी २५ प्रश्न सोडवायचे होते. प्रत्येक प्रश्न २ गुणांसाठी विचारला होता. ही परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला कठोर परिश्रम करावे लागले. मोबाईल अ‍ॅप ते सव्र्हरपर्यंत बऱ्याच  समस्या आल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. मात्र, आता परीक्षा संपल्या असल्या तरी विद्यापीठावर निकालाची मोठी जबाबदारी आहे. आधीच करोनामुळे प्रवेश प्रक्रिया लांबल्या आहेत. त्यातच आता परीक्षा आणि निकाल लांबल्याने विद्यापीठावर प्रवेश प्रक्रियेचे दडपण आहे.

आरक्षणाचा तिढा

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक आरक्षणावर झाला आहे. आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने राज्यातील विविध प्रवेश प्रक्रिया प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठाने डिसेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्धार केला असला तरी त्यासाठी शैक्षणिक आरक्षणाची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.