News Flash

प्रदेश काँग्रेस समितीचेही विभाजन करा

देश काँग्रेसच्या विभाजनाचीही मागणी पुढे येऊ लागली आहे.

विदर्भासाठी स्वतंत्र काँग्रेस समितीची मागणी

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरून राज्यातील काँग्रेसमध्ये विदर्भवादी विरुद्ध संयुक्त महाराष्ट्रवादी अशी उभी फूट पडली असतानाच आता प्रदेश काँग्रेसच्या विभाजनाचीही मागणी पुढे येऊ लागली आहे. विदर्भासाठी स्वतंत्र काँग्रेस समिती तयार करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे प्रदेश काँग्रेसच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य, कट्टर विदर्भवादी आणि माजी मंत्री अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी केली आहे. यासंदर्भात नागपुरात नुकत्याच झालेल्या पक्ष नेत्यांच्या बैठकीतही प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाल्याचेही किंमतकर यांनी स्पष्ट केले.

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर मंगळवारी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार, नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी यांनी विधिमंडळात संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा रेटून धरणारे स्वपक्षीय नेते अनुक्रमे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी विदर्भासाठी स्वतंत्र काँग्रेस समितीचा मुद्दा पुढे केला. प्रदेश काँग्रेसचे विभाजन हे प्रदेशाध्यक्षाच्या अखत्यारितील विषय नाही, तो केंद्रीय नेतृत्वाकडे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवू, विदर्भासाठी स्वतंत्र समिती असल्यास या भागातील प्रश्नाला न्याय मिळेल, प्रदेश काँग्रेस समितीत राहून ही बाब शक्य नाही.

यासंदर्भात यापूर्वीच पक्षपातळीवर चर्चा सुरू झाली आहे, अलीकडेच काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये रविभवन येथे विदर्भातील काँग्रेस नेत्यांची बैठक झाली होती. त्यातही या मुद्यावर सांगोपांग चर्चा झाली. पुढच्या काळात हा मुद्दा अधिक जोरकसपणे केंद्रीय नेतृत्वाकडे मांडण्यात येईल, असे अ‍ॅड. किंमतकर म्हणाले.

विदर्भ हा महाराष्ट्रातच राहावा, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे सध्या जे विदर्भप्रेम ऊतू आले आहे, ते पुतना मावशीचे आहे. याच लोकांनी सत्तेत असताना विदर्भावर अन्याय केला, त्यांच्यामुळेच विदर्भात अनुशेष निर्माण झाला, ही बाब ते आताही मान्य करतात व विदर्भाचा विकास करू असे सांगतात, मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही, अशी टीकाही किंमतकर यांनी केली.

सेनेला अधिकार नाही, फडणवीस यांनी जोर लावावा

युतीची सत्ता असतानाच्या काळात खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रामटेकमध्ये येऊन विदर्भाचा अनुशेष तीन वर्षांत दूर न झाल्यास विदर्भ राज्य देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यांच्या सत्ताकाळातही काहीच बदल झाला नाही, त्यामुळे त्यांना स्वतंत्र विदर्भाला विरोध करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला किंमतकर यांनी हाणला. राज्याचे मुख्यमंत्री हे कट्टर विदर्भवादी असले तरी अलीकडच्या काळात त्यांच्या भूमिकेवर शंका घेण्यास वाव आहे, त्यांनी हा मुद्दा पक्षश्रेष्ठींच्या गळी उतरविण्यासाठी जोर लावावा, अशी मागणीही त्यांनी केली.

काँग्रेसकडूनही पाठपुरावा

विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी किंवा या भागाचा विकास करण्यासाठी काहीच केले नाही हा आरोप चुकीचा आहे, आपण (किंमतकर), सतीश चतुर्वेदी, नानाभाऊ एम्बडवार यांच्यासह इतरही विदर्भातील तत्कालीन मंत्र्यांनी जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा तेव्हा पक्ष पातळीवर हा मुद्दा रेटून धरला, विदर्भातील अनुशेष उघड करणाऱ्या दांडेकर समितीची स्थापनाच आपण त्याकाळी विदर्भातील प्रश्नांचा पाठपुरावा केल्याने झाली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 2:35 am

Web Title: demand for a separate vidarbha congress committee
Next Stories
1 सहायक पोलीस आयुक्तपदी बढती रखडलेलीच
2 आता ‘मराठी’विना रिक्षांचे परवाने
3 हरणांच्या संख्येत ३० टक्क्यांनी घट
Just Now!
X