महेश बोकडे

शासनाने २० एप्रिलपासून राज्यातील उद्योगांना काही अटी व शर्थीवर उत्पादन सुरू करण्याची मुभा दिली. परंतु अद्यापही उद्योग सुरू न झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत विजेची मागणी ३ हजार मेगावॉटने घटली आहे. परिणामी  महावितरणलाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

गेल्यावर्षी मे- २०१९ मध्ये राज्यात घरगुतीपासून उद्योगांपर्यंत सर्वच गटातील ग्राहकांकडून विजेची मागणी २२ हजार मेगावॉट होती. त्यात उद्योगांचा वाटा ३० टक्क्यांहून अधिक होता. परंतु यंदा अर्थात मे- २०२० मध्ये राज्यात १८,००० ते १८,५०० मेगाव्ॉट इतकीच मागणी नोंदवली जात आहे.

राज्यातील मागणी ३ ते साडेतीन हजार मेगावॉटने कमी झाली असून त्याला उद्योग बंद असणे हेच  प्रमुख कारण आहे. टाळेबंदीत घरात अडकलेल्या नागरिकांमुळे एसी व कुलरचा वापर वाढल्याने १,००० ते १,५०० मेगावॉटने विजेची मागणी वाढली आहे.  त्या तुलनेत उद्योगांमुळे केवळ १,००० ते १,४०० मेगावॉटच मागणी वाढली आहे.

उद्योगांकडून विजेची मागणी खूप कमी असल्याने महावितरणही आर्थिक अडचणीत आहे. परंतु शासनाने मुभा दिल्यावर हळूहळू मागणी वाढत आहे. लवकरच स्थिती पूर्ववत होण्याची आशा आहे.

– अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण