01 June 2020

News Flash

धर्मातरबंदी कायद्याची मागणी म्हणजे विवेकावर हल्ला

फादर दिब्रिटो यांचे स्पष्ट प्रतिपादन

(संग्रहित छायाचित्र)

शफी पठाण

धर्म कधी कुणावर लादता येत नाही. तो स्वेच्छेनेच स्वीकारला जात असतो. धर्म कुठलाही असो तो जर उदारतेची शिकवण देत असेल, सर्व जगाच्या कल्याणाचा उपदेश करत असेल आणि या वैशिष्टय़ांमुळे तो जर एखाद्याला स्वीकारायचा असेल तर त्यात कायद्याची आडकाठी कशाला हवी? अशा धर्मातराचा हक्क भारतीय संविधानाने नागरिकांना प्रदान केला आहे. हे वास्तव असतानाही जर कुणी धर्मातरबंदी कायद्याची मागणी करीत असेल तर माझ्या मते तो विवेकावर केलेला हल्ला आहे, असे स्पष्ट  प्रतिपादन उस्मानाबादमध्ये होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले.

विदर्भ साहित्य संघाचा सत्कार स्वीकारण्यासाठी नागपुरात आले असता ते ‘लोकसत्ता’शी बोलत होते. धर्म आणि साहित्याचा संबंध स्पष्ट करताना फादर म्हणाले, धर्म व्यक्तीला नीती आणि माणुसकी शिकवत असतो. हिंदूच्या गीतेतील, मुस्लिमांच्या कुराणातील वा ख्रिस्ताच्या बायबलमधील तत्त्वज्ञान केवळ इतरांना सांगण्यापुरते असेल आणि ते सांगणाऱ्यांच्या आयुष्यात कुठेच झिरपत नसेल तर ते  तत्त्वज्ञान  इतरांना सांगण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही. आज एकीकडे सर्रास जंगल कापून दुसरीकडे वडाची पूजा केली जाते. याला काय अर्थ आहे? कोणताच धर्म पर्यावरणाचे नुकसान सांगत नाही. परंतु दुर्दैवाने धर्म अभ्यासताना आम्ही त्या धर्मातील सोयीचे तेवढे घेत असतो. अयोध्येच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वरक्षणविषयक काळजी घेतली जात आहे. पोलीस तैनात केले जात आहेत. हा दिवस आम्हाला का बघावा लागला? जे तरुण या निकालाकडे लक्ष लावून बसले आहेत त्यांच्या प्राधान्याचा विषय मंदिर-मशीद हवे की नोकरी-रोजगार? या तरुणाईची ऊर्जा धार्मिक वादात वाया न जाता देशहितासाठी वापरता यावी, यासाठी सरकार नावाची यंत्रणा काय उपाययोजना करतेय, हे कुणी तपासणार आहे की नाही? पंतप्रधान मोदींनी आपल्या देशातील योगसंस्कृतीला जगभर पोहोचवले. ही खरच अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु सकाळी योगा करून दुपारी आम्ही कुणाला फसवत असू तर त्या योगसाधनेला काय अर्थ आहे? मी फादर असूनही लोक माझ्या पाया पडतात. मला फार अवघडल्यासारखे होते. परंतु ही आदर भावनाच आपल्या देशाचे वैशिष्टय़ आहे. हा ठेवा आपण जगाला दिला पाहिजे. ज्ञानेश्वरांची ‘आता विश्वात्मके देवे’ ही संकल्पना जगाला नव्याने सांगितली पाहिजे. केवळ जागतिकीकरणातून गुंतवणूक मिळवून उपयोग नाही. गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न समाजाच्या शेवटच्या वस्तीपर्यंत झिरपले पाहिजे, असे वाटणे हा खरा धर्म आहे. दुसऱ्याला दुखावणारा वा दुसऱ्याचे अहित चिंतणारा विचार कधीच धर्माचा विचार असू शकत नाही, याकडेही  फादर दिब्रिटो यांनी लक्ष वेधले.

इस्रायलकडून हॅकिंगऐवजी कृषी तंत्रज्ञान घ्या

मी संशोधनासाठी इस्रायलमध्ये बराच काळ घालवला आहे. या मरूभूमीने कृषीक्षेत्रात केलेली प्रगती नेत्रदीपक आहे. इस्रायलकडून घ्यायचेच असेल तर कृषी तंत्रज्ञान घ्यायला हवे. हॅकिंगऐवजी ते देशाच्या नक्कीच हिताचे ठरेल, असे सूचक वक्तव्यही  फादर दिब्रिटो यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 1:30 am

Web Title: demand for proselytizing law is an attack on conscience abn 97
Next Stories
1 सत्ताधाऱ्यांकडून‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे हेरगिरीचा संशय
2 म्हणे, अतिवृष्टीमुळे ‘स्वयंम अध्ययन अहवाल’ला उशीर!
3 दुचाकीच्या वेगाचे वेड जीवावर बेतले
Just Now!
X