महापालिकेत नियोजनाचा अभाव

नागपूर : नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते महापालिकेतील नियोजनाच्या अभावामुळे पुन्हा तोडले जात असून ते वेळेत बुजवले जात नसल्याने नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शहरात सर्वत्र अशी परिस्थिती असून महापालिकेतील वेगवेगळ्या विभागांचे आपापसातच समन्वय नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व नियोजन यंत्रणा अस्तित्वात आहेत. पण, या यंत्रणांमध्ये मोठ्या पदावर असलेले अधिकारी केवळ राजकीय पुढाºयांच्या पाठीमागे राहून मान डोलावण्यात  धन्यता मानत असल्याने उपराजधानीचा विकास विचित्र पद्धतीने सुरू आहे. सिमेंट रस्ते, मेट्रो, भूमिगत वीज वाहिनी, ओसीडब्ल्यू, फायबर ऑप्टिक केबल आदींच्या कामासाठी सर्वत्र खोदकाम करण्यासाठी नव्याने तयार करण्यात येणारे रस्ते खोदण्यात येतात व ते वेळेत बुजवण्यात येत नाही. असाच काहीसा प्रकार देवनगर ते साईमंदिर आणि देवनगर ते खामला चौकादरम्यान दिसून येतो. हे रस्ते दोन ते तीन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले. डांबर टाकून रस्ते गुळगुळीत झाल्याने स्थानिक लोकांमध्ये आनंद होता. पण, काही दिवसांत स्थानिक लोकांच्या आनंदावर विरजण पडले व भूमिगत वीज वाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आले.  रस्त्यांचे बांधकाम करण्यापूर्वीच त्या ठिकाणी प्रस्तावित  भूमिगत कामे करण्यात येऊ शकतात. याकरिता महापालिकेचे विद्युत विभाग, जलप्रदाय विभाग, लोककर्म विभाग आणि हॉट मिक्स प्रकल्प विभागाने समन्वय साधून  निर्णय घ्यायला हवे. त्यानुसार विविध कंत्राटदारांना परवानगी द्यायला हवी. यामुळे काम व्यवस्थित होतील. रस्ता बांधकामानंतर खोदकाम टाळता येईल व करातून गोळा झालेल्या जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही. याकरिता महापालिका आयुक्तांनी पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी होत आहे.

नियोजनाला निधीचा फटका

महापालिका प्रशासनालाही वाटते की सर्व कामे नियोजनानुसार व्हायला हवीत. पण, अनेकदा एका कामाचा निधी उपलब्ध असतो तर दुसऱ्या कामासाठी निधी नसतो. त्यामुळे महत्त्वाचे असलेली कामे करून घ्यावी लागतात व निधी उपलब्ध झाल्यानंतर इतर कामांना परवानगी द्यावी लागते. रस्ते तयार झाल्यानंतर भूमिगत वीजवाहिनी किंवा इतर कामांसाठी होणाऱ्या खोदकामाची महापालिकेला जाणीव आहे. कुठे प्रशासनाच्या दिरंगाईने असा प्रकार घडला असल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई करू

– राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त.