News Flash

नोटाबंदी वर्षपूर्ती : सर्वसामान्यांचे झाले हाल; व्यापार पन्नास टक्के प्रभावित

देशात नोटाबंदी लागू होताच चलन-वलन प्रक्रियेत मोठा अडथळा सहन करावा लागला.

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चलनात असलेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवर अचानक बंदी घातली. या निर्णयामुळे देशभरात एकच गोंधळ उडाला. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे काय साध्य झाले, हे सांगता येणे कठीण असले तरी सर्वसामान्यांना मात्र त्याचा नाहक त्रास झाला, तर तब्बल पाच महिने व्यापार पन्नास टक्क्यांनी प्रभावित झाला.

देशात नोटाबंदी लागू होताच चलन-वलन प्रक्रियेत मोठा अडथळा सहन करावा लागला. सर्वप्रथम जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेत मोठय़ा रांगा लावाव्या लागल्या. त्यानंतर नवीन दोन हजार आणि पाचशे रुपयांची नोट मिळविण्यासाठी परत बँकेत चकरा माराव्या लागल्या. तेव्हा बँकेत प्रचंड गर्दी असल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास झाला.

पैशांसाठी रांगेत उभे असताना काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक खातेदारांना त्यांचाच पसा मिळविण्यासाठी अनेक निकष लावण्यात आले. काही दिवसांनी एकावेळी केवळ दोन हजाराची एक नोट देणे सुरू झाले.

त्यामुळे सुटय़ा पशांचा तुटवडा निर्माण झाला. हातात कमी पसा मिळत असल्याने अनेकांनी खर्चाला मुरड घालण्यावर भर दिला. अशात बाजारात खेळणारा पसा अचानक आटला व त्याचा थेट परिणाम व्यापारावर पडला. देशभरातील अनेक उद्योगांसह व्यापारी व्यवहार ठप्प झाले.

ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली. करचुकवेगिरी, बेहिशेबी पसा, भष्टाचार, काळा पसा, दहशतवादी कारवायांना चपराक बसेल असे सांगत नोटाबंदी केल्याचा दावा सरकारने केला. वस्तुत: यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला गेला. व्यापारी हतबल झाले. शेतकरी हवालदिल झाला.

शेतमालाच्या खरेदीची बोली थांबली. सामान्य जनता या निर्णयाला वैतागली. विशेष म्हणजे, मध्य भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला कळमना बाजार ठप्प पडला होता. व्यापार जवळपास चाळीस ते पन्नास टक्के प्रभावित झाला होता. नोटाबंदीतून व्यापारी सावरत नाही तर लगेच जीएसटी लागू झाल्याने अद्याप बाजारात उठाव मर्यादितच आहे. एकंदरीत नोटाबंदीचा प्रभाव पाच महिने कायम राहिला.

यादरम्यान सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.

बेरोजगारी वाढली 

एलबीटी, वीजदर यामुळे उद्योगांचा उत्पादन खर्च आवाक्याबाहेर जाऊ लागला. त्यात नोटाबंदीमुळे मालाला उठाव मिळाला नाही. परिणामी, शहरातील उद्योगाची चाके मंदावली. आणखी किती महिने या संकटाचा सामना करावा लागेल, याचा अंदाज कुणालाही लागला नाही. त्यामुळे या संकटातून मार्ग काढण्यासाठी कंत्राटी कामगाराची कपात करण्यात आली. नवीन कामगार भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. रोजगाराच्या आशेने शहरात आलेले कामगार आपल्या गावाची वाट धरून परतले आणि बेरोजगारी वाढली.

काँग्रेसच्या गटांचे वेगवेगळे आंदोलन

शहर काँग्रेसच्या वतीने नोटबंदीची वर्षपूर्ती काळा दिन म्हणून पाळण्यात येत आहे. त्यासाठी दुपारी ३ वाजता टेलिफोन एक्सचेंज चौकात एकत्रित येत आहेत. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेमधीलअसंतुष्ट गटदेखील काळा दिन पाळणार आहेत. त्यांचे आंदोलन संविधान चौकात होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत करणार आहेत. काळ्या फिती लावून दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत आंदोलन करण्यात येईल. रात्री ८ वाजता मेणबत्ती लावून नोटाबंदी निर्णयांचा निषेध करण्यात येणार आहे. शहर भाजपच्या वतीने शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात नोटबंदीचा हा दिवस काळा पैसा बंदी दिन म्हणून साजरा केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक आमदार आणि शहरातील पदाधिकारी करणार आहेत.

पन्नास टक्क्यांनी व्यापार ठप्प

नोटाबंदीचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याचे नियोजन फसले. त्यामुळे जनतेला आणि व्यापाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. त्याच दरम्यान शेतकऱ्यांचा माल बाजारात आला असल्याने खरेदी झाली नाही अन् शेतकऱ्यांनाही नोटाबंदीचा फटका बसला. व्यापाऱ्यांना तर सर्वात जास्त फटका बसला असून तब्बल पन्नास टक्के व्यापाऱ्याचे नुकसान झाले. जनतेलाही कमी खर्च करण्याची सवय झाली. त्यामुळे व्यापारही ठप्प पडले.

बी.सी. भरतिया, अध्यक्ष कॅट

सर्वसामान्यांचे हाल 

नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे हाल झाले यात शंका नाही. सर्वसामान्यांजवळ काळा पसा नसतो. तो मेहनतीचा असतो. त्यांचे महिन्याभराचे योग्य नियोजन असते. नोटाबंदीमुळे ते नियोजन कोलमडले अन् केवळ आवश्यक वस्तू खरेदी केल्या जाऊ लागल्या. त्यामुळे हातात पसा नसल्याने ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली अन् त्याचा थेट फटका व्यापारावर पडला. व्यापार चाळीस टक्क्यांनी प्रभावित झाला. तब्बल चार महिने याची झळ सर्वाना बसली.

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष. चिल्लर किराणा व्यापारी संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 12:43 am

Web Title: demonetisationbusiness slow down
Next Stories
1 नोटाबंदी वर्षपूर्ती : रोखरहित व्यवहाराला नागरिकांचा अल्प प्रतिसाद
2 मुख्यमंत्र्यांचे भाषण घोषित शांतता क्षेत्रात
3 दारू तस्करीचे नागपूर ‘हब’
Just Now!
X