News Flash

अमेरिकेच्या दबावातून नोटाबंदी

ज्या देशात ९७ टक्के लोक रोखीने व्यवहार करतात, त्या देशात असे बदल त्रासदायक ठरतात.

अमेरिकेच्या दबावातून नोटाबंदी
पृथ्वीराज चव्हाण (संग्रहित छायाचित्र)

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

देशातील नोटबंदीच्या निर्णयाचे मूळ नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे तत्कालीन  राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत केलेल्या करारात दडले आहे. डिजीटल पेमेंटचा पुरस्कार करणाऱ्या कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या बीटीसीएशी मोदींनी हा करार केला. आता या कराराची कागदपत्रे देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. यावरून अमेरिकेच्या दबावातून हे बंदीचे कारस्थान रचण्यात आले, असा निष्कर्ष सहज काढता येतो असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केला.

ज्या देशात ९७ टक्के लोक रोखीने व्यवहार करतात, त्या देशात असे बदल त्रासदायक ठरतात. मात्र, मोदींना अर्थशास्त्राचे अजिबात ज्ञान नाही. यासंदर्भात ते निरक्षर आहेत. त्यातून त्यांनी धाडस दाखवण्याच्या नादात हे बंदीचे पाऊल उचलले व सर्व देशाला मंदीच्या खाईत टाकले असे चव्हाण म्हणाले. डिजीटल पेमेंटवर लागणाऱ्या कमिशनवर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी भारताकडे लक्ष केंद्रित केले आणि त्यांच्या दबावाला मोदी बळी पडले, असे ते म्हणाले.

नोटबंदीनंतर अनेकांनी काळा पैसा पांढरा केला. रिझव्‍‌र्ह बँकेला बाद नोटा मोजायला नऊ महिने लागतात, यातच सर्वकाही आले, असे ते म्हणाले. मार्केटिंग करण्यात वस्ताद असलेल्या पंतप्रधानांनी गेल्या तीन वर्षांत केवळ घोषणा केल्या. त्यातील एकही घोषणा पूर्ण होऊ शकली नाही.

अमेरिका व इंग्लंडमधील निवडणुकीचे तंत्र वापरून एकदा निवडणूक जिंकता येते, वारंवार नाही असा टोला चव्हाण यांनी लगावला. कोणत्याही देशाचा पंतप्रधान परदेशात जातो तेव्हा तो देशांतर्गत उत्पादने किती विकली जाईल याचा हिशेब करीत असतो. मोदी मात्र विक्रेते म्हणून नाही तर खरेदीदार म्हणून परदेश दौरे करतात, असा आरोप चव्हाण यांनी केला.

अलीकडे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संघाने सुचवलेल्या राम माधव व विनय सहस्त्रबुद्धे यांना संधी मिळाली नाही. तेव्हापासून संघाचे लोक मोदींवर नाराज आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण या वेळी म्हणाले.

चौकशीबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार

गेल्या अधिवेशनात भ्रष्ट मंत्री व अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून पाठीशी घालण्याचा मुद्दा मी लावून धरला होता. अजूनही देवेंद्र फडणवीस या प्रकरणांची गंभीरपणे चौकशी करायला तयार नाहीत. याबाबत चौकशी हे निव्वळ नाटक आहे. त्यामुळे या मुद्यावर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरू आहे, असे चव्हाण म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2017 3:42 am

Web Title: demonetization us pressure prithviraj chavan
Next Stories
1 दर्जा उन्नतीच्या नुसत्याच घोषणा, सुविधांच्या नावे बोंब
2 सामाजिक क्षेत्रात लेखन करणारा कादंबरीकार हरपला
3 राज्यातील आयुर्वेद महाविद्यालयातील कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती अडचणीत
Just Now!
X