तिसऱ्या दिवशी ५ हजार घरांची तपासणी

नागपूर : महापालिकेच्या तपासणी पथकाला शुक्रवारी अंबाझरी लेआऊट येथील प्रन्यासच्या जलतरण तलावात (स्वीमिंग टँक) परिसरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित औषध टाकून त्या नष्ट केल्या. यानंतर कर्मचाऱ्यांनी अंबाझरी लेआऊटच्या संपूर्ण परिसराची तपासणी केली. शुक्रवारी प्राप्त झोननिहाय अहवालानुसार शहरात ५ हजार १०५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २७० घर परिसरात डेंग्यू अळ्या असलेले दूषित पाणी आढळले.

डेंग्यूवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या मलेरिया व फायलेरिया विभागातर्फे घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. तिसऱ्या दिवशी शुक्रवारी केलेल्या तपासणीत ५७ ताप असलेले रुग्ण आढळले. तर ८९ जणांच्या रक्ताचे नमुने तर १३ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आलेत. दरम्यान, १५२६ घरांतील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात २१२ कुलर्समध्ये डासांच्या अळ्या आढळल्या.

धरमपेठ झोनच्या कर्मचाऱ्यांमार्फत नागपूर सुधार प्रन्यासच्या जलतरण तलावाची (स्वीमिंग टँक) नुकतीच तपासणी करण्यात आली. या झोनमध्ये आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, गुरुवारी  झोननिहाय शहरात ८४३४ घरांची तपासणी करण्यात आली असून त्यात ४३० घरांत डेंग्यू अळ्या असलेले दूषित पाणी आढळले. तपासणीत १०३ तापाचे रुग्ण आढळले.  यावेळी १९४ जणांच्या रक्ताचे नमुने तर ३१ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत.