रुग्णसंख्या तीनशेच्या उंबरठय़ावर; सात दिवसांत ६९ रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात डेंग्यूची दांडगाई आणखी वाढली असून ८ जुलै ते १४ जुलै दरम्यान सात दिवसांमध्ये ६९ नवीन डेंग्यूग्रस्तांची भर पडली आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२१ पासून जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या डेंग्यूग्रस्त रुग्णांची संख्या तीनशेच्या उंबरठय़ावर म्हणजे २९१ रुग्णांवर पोहोचली आहे.

जिल्ह्य़ात सात दिवसांत आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये शहरातील ३०, ग्रामीणच्या ३९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात डेंग्यूचा प्रकोप कायम असल्याचे दिसत आहे. त्यातच १ जुलै ते ७ जुलै दरम्यान सात दिवसांत नागपूर शहरात १४४, ग्रामीणचे ४५ असे एकूण १८९ रुग्ण आढळले होते. दुसऱ्या आठवडय़ात ही संख्या कमी झाली असली तरी आजही प्रत्यक्षात अनेक खासगी रुग्णालयांकडून नागपूर महापालिका व सार्वजनिक आरोग्य विभागाला सर्व  रुग्णांची आकडेवारी दिली जात नसल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे. त्यामुळे ही संख्या प्रत्यक्षात खूपच कमी दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या नवीन रुग्णांमुळे शहरातील १ जानेवारी २०२१ ते आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या शहरात १८०, ग्रामीणला १११ अशी एकूण २९१ रुग्णांवर पोहोचली आहे. या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे गेल्या एक ते दीड महिन्यातील आहेत, हे विशेष.

दरम्यान, महापालिका व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी करोना काळात कीटकनाशक फवारणीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या सेवा करोनाशी संबंधित कामात लावल्या होत्या. त्यामुळे कीटकजन्य आजाराशी संबंधित फवारणीसह इतर कामात दुर्लक्ष झाल्याने हे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. परंतु  महापालिकेसह आरोग्य विभागाला डेंग्यू वाढल्यावर जाग आली असून सर्वत्र कीटकनाशकांच्या फवारणीला गती दिली गेली आहे.

पूर्व विदर्भातील डेंग्यूची स्थिती

१ जानेवारी २०२१ ते १४ जुलै २०२१

जिल्हा                        रुग्ण

नागपूर (श.)                १८०

नागपूर (ग्रा.)               १११

वर्धा                            ५३

भंडारा                         ०३

गोंदिया                       ०७

चंद्रपूर (ग्रा.)                  १६

चंद्रपूर (श.)                  ०६

गडचिरोली                   ०१

एकूण                        ३७७