जुलै- २०१९ मध्ये १८ रुग्ण पॉझिटिव्ह; उत्तर नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद

उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे सर्वत्र डास वाढले असून डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक रुग्ण उत्तर नागपुरातील आशिनगर झोनमध्ये असून महापालिकेकडे जुलै- २०१९ या एकाच महिन्यात तब्बल १८ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवण्यात आले.

नागपूरसह पूर्व विदर्भात २०१८ मध्ये डेंग्यूने थैमान घातले होते. त्यावेळी येथे १ हजार १९९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यातील निम्म्याहून अधिक ६६८ रुग्ण हे फक्त नागपूर जिल्ह्य़ातील होते. शहरात साडेपाचशेहून अधिक रुग्ण आढळले असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्यावर नियंत्रण करता आले नव्हते.महापालिकेकडे कमी कर्मचाऱ्यासह तोकडय़ा पायाभूत सुविधा असल्याने यावर नियंत्रण शक्य नसल्याचा प्रकार लोकसत्ताने उघडकीस आणला होता.

तरीही शहरातील सर्वच भागात डास वाढल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उत्तर नागपूर, गोधनी, गायत्रीनगर, बाबा फरीदनगर, दाभासह बऱ्याच भागात कीटकनाशक फवारणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. जुलै महिन्यात शहरात तब्बल १८ डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवले गेले. दरम्यान मेडिकल, मेयोसह शहरातील खासगी रुग्णालयांतही अचानक डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढले असून मेडिकल, मेयोच्या बाह्य़रुग्ण विभागात रुग्णसंख्याही वाढून थेट साडेपाच हजारांवर पोहचली आहे.

खासगी रुग्णालयांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

डेंग्यू हा नोटीफाईड आजार असून खासगी रुग्णालयांनी या आजाराच्या प्रत्येक रुग्णांची माहिती महापालिकेला कायद्याने देणे बंधनकारक आहे. परंतु अद्याप खासगी रुग्णालयांकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे.या रुग्णालयांवर कारवाई होणार काय? याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

‘‘शहराच्या सर्वच भागात कीटकनाशक फवारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. आशीनगर झोनमध्ये जुलैला जास्त रुग्ण आढळल्याने तेथे जास्त लक्ष दिले गेले. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद कमी असली तरी खासगी रुग्णालयांना रुग्ण आढळताच माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. माहिती न देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत औषध उपलब्ध असून जनजागृतीवरही भर दिला जात आहे.’’      – जयश्री थोटे, आरोग्य विभाग, नागपूर महापालिका.