हिंगणापासून ८ ते १० किलोमीटरवर सावंगी (देवळी) येथे हरितालिकेच्या पूजेसाठी बंधाऱ्यावर गेलेल्या सहा जणींचा बुडून मृत्यू झाला. त्या गावातील इंदिरानगर झोपडपट्टीत शेजारीच राहणाऱ्या होत्या. सकाळी गौरी पूजेसाठी गेलेल्या सहाही जणींचे मृतदेहच दुपारी घरी आणले. त्यामुळे या वस्तीत हरितालिकेच्या दिवशी शोककळा पसरली होती. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, मृतांच्या वस्तीकडे ते फिरकलेही नाही. त्यामुळे नाराजी पसरली आहे.

सावंगी (देवळी) गावाजवळ नाला वाहतो. नाल्याच्या दोन्ही काठांवर गावाची विभागणी झाली आहे. इंदिरानगर ही वस्ती शेतमजुरांची आहे. याच वस्तीत राहणाऱ्या नंदा नत्थुजी नागोसे (५०) यांचा परिसरातील मुलींशी जीवाभावाचा संबंध. म्हणूनच त्यांनी त्यांच्याच झोपडीवजा घराजवळ राहणाऱ्या प्रीया राऊत (१८), जान्हवी चौधरी (१३), पूजा दडमल (१७), पुनम दडमल (१७), प्रणीता शंकर चामलाटे (१७) या मुलींना हरितालिका पूजेसाठी सोबत चालण्याची गळ घातली. प्रीयाने सुरुवातीला नकार दिला होता. नंदा यांनी आग्रह धरला, त्यामुळे या सर्व मुली त्यांच्यासोबत गेल्या. कंत्राटदारांनी बांधाऱ्यात करून ठेवलेल्या खड्डय़ात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या सर्वजणी दरवर्षी त्याच ठिकाणी हरितालिकेची पूजा करतात. त्यामुळे यंदाही कोणी त्यांच्यावर आक्षेप  घेतला नाही. पाण्यात उतरल्यावर या सर्वजणी अंदाज घेतच पुढे सरकत होत्या. कुणालाही तेथे खड्डा आहे याची कल्पना नव्हती. मात्र, प्रथम एक मुलगी बुडाली आणि तिला वाचविण्यासाठी एकापाठोपाठ एक सर्वानी प्राण गमाविले. सकाळी ११ वाजता गेलेल्या मुली बुडाल्याचा संदेश दुपारी १२ वाजता आला. वस्तीत एकच हलकल्लोळ माजला. या पाचही जणी मैत्रिणी होत्या. गावातील शाळेत त्या शिकायला जायच्या. आई-वडिलांना मदत म्हणून मजुरीवरही जात होत्या, असे गावकरी सांगत होते. हरतालिकेच्या दिवशी घडलेल्या घटनेने परिसरातील गावांत शोकाकूल वातावरण होते. इंदिरानगरात आक्रोश होता. प्रीयाच्या आई रडून रडून बेशुद्ध झाली होती. नंदा यांचा एकुलता मुलगा कपाळावर हात ठेवून बसला होता. सर्वाचा संताप शासकीय यंत्रणेवर होता. कंत्राटदाराने खड्डा केल्यानेच सहा जणींचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.

मंत्री आले अन् गेले

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटानस्थळी भेट घेतली. तोपर्यंत गावात हजारो लोक उपस्थित होते. अनेक अधिकारीही तेथे पोहोचले होते. गाडय़ांमुळे गावाला जत्रेचे रूप आले होते. पालकमंत्र्यांनी घटनास्थळी मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांची भेट घेतली व निघून गेले. त्यानंतर अध्र्यातासात गाव रिकामे झाले. ज्या वस्तीतील सहा जीव गेले त्या वस्तीकडे कोणीही फिरकले नाही. या वस्तीतील आक्रोश कोणी ऐकूणही घेतला नाही. त्यामुळे कमालीचा संताप व्यक्त केला जात होता.

नंदाचा मुलींवर जीव

या दुर्घटनेत दगावलेल्या नंदा नागोसे यांचा त्यांच्यासोबतच दुर्घटनेत बळी पडलेल्या पाच मुलींवर सख्या मुलींसारखे प्रेम होते. नंदा यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार या सर्व मुलींचा जन्म त्यांच्या समोरचा होता. त्यांच्या अंगाखांद्यावर त्या खेळल्या होत्या. म्हणूनच दरवर्षी हरितालिका पूजनासाठी या मुलींना त्या बोलवित असत. आजही त्यानुसारच बोलविले पण कोणीच परत आले नाही. नंदा यांच्या घरी त्यांच्यासह पती आणि मुलगा राहतात. त्या गेल्याने मुलगा एकाकी झाला.