परिवहन विभागाला मात्र तातडीने १ हजार कोटी दिले; माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

नागपूर : शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या परिवहन विभागाला १ हजार कोटीचे अनुदान तातडीने देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसकडे असलेल्या ऊर्जा खात्याच्या अनुदानाची  फाईल मात्र स्वाक्षरी न करताच फेकून दिली, असा आरोप  माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. गुरुवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, राज्यात ९६ लाख वीज ग्राहकांनी सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून वीज देयके भरली नाही. १०० युनिट पर्यंत बिल माफ करू, असे स्वत: ऊर्जामंत्री म्हणाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दबावात येऊन त्यांनी निर्णय बदलला. ऊर्जामंत्री हतबल झाले आहेत. सामाजिक चळवळीतून आलेल्या राऊत यांचे नाव कसे खराब होईल, यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनीच त्यांना तुम्ही घोषणा करा असे सांगितले आणि विभागाला अनुदान दिले नाही. त्यामुळे  ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सरकारमधून बाहेर पडायला हवे. वीज खात्याला साडेसहा हजार कोटी  दिले तरी वीज कर्मचाऱ्यांच्या बोनससह इतर सर्व मुद्दे निकाली निघतात. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची तशी मानसिकता नाही. मुख्यमंत्री  नितीन राऊत यांच्या पाठीशी नसल्यामुळे ऊर्जा विभागातील अधिकारी सुद्धा त्यांचे ऐकत नाहीत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. वैधानिक विकास महामंडळ  सरकारने गुंडाळून ठेवत विदर्भावर अन्याय केला आहे. करोनाच्या नावाखाली हिवाळी अधिवेशन मुंबईत घेत आहेत.  मुंबईत करोना नाही, असे सरकारला वाटते का? नागपुरात अधिवेशन न घेणे हे नागपूर कराराचे उल्लंघन असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

राज ठाकरे यांचे आभार

राज ठाकरे यांचे मी आभार मानतो. त्यांनी ५ कोटी लोकांचा  वीज बिल माफ करण्याचा विषय उचलून धरला आहे. आम्ही या मुद्द्यावर त्यांना पाठिंबा दिला आहे, असे सांगत बावनकुळे यांनी भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले.