News Flash

उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘एसीबी’ चौकशी होणार?

सिंचन गैरव्यवहार प्रकरण; तपास सीबीआयकडे वर्ग होण्याची शक्यता

(संग्रहित छायाचित्र)

सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवार यांच्यावर ठपका असून या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) करण्यात येत आहे. पण, पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे एसीबी त्यांची चौकशी नि:पक्षपातीपणे करू शकेल का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर हा तपास ‘सीबीआयक’डे वर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात सिंचन प्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला. सध्या या प्रकरणी एसीबीच्या विशेष तपास पथकांकडून २० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले असून ३०२ निविदांची चौकशी सुरू आहे. त्यातील १९५ प्रकरणे गोसीखुर्दशी संबंधित असून १०७ इतर प्रकल्पांसंदर्भात आहेत. दाखल झालेल्या २० गुन्ह्य़ांपैकी चार प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून एक प्रकरण न्यायालयाने रद्द केले. चार प्रकरणे तपास अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ११ प्रकरणे राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.

सिंचन गैरव्यवहाराबाबत उच्च न्यायालयात जनमंच आणि अतुल जगताप यांच्या याचिका आहेत. राज्य सरकारने २७ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करून या गैरव्यवहारासाठी अजित पवार जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. आता पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा तपास एसीबी कसा करणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. एकंदर परिस्थिती बघता जनमंचच्या याचिकेत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी २८ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यावेळी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती पुन्हा केली जाऊ शकते.

अध्यक्षांच्या निवडणुकीकडे लक्ष

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान झाल्यास राष्ट्रवादीचे आमदार कोणत्या बाजूने मतदान करतात यावरही सारे अवलंबून असेल. अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान होते. यात अजित पवार यांच्याबरोबर असलेले आमदार पक्षाच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अध्यक्ष निवडून आल्यास भाजपला पुढील खेळी सोपे जाईल. राज्यात आतापर्यंत १९९९ मध्ये एकदाच अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान झाले होते.

राष्ट्रवादीचा आत्मविश्वास बळावला

अजित पवार यांच्या बंडानंतर सकाळी राष्ट्रवादीचे नेतृत्व हतबल झाले होते, पण शरद पवार यांनी सारी सूत्रे हाती घेतली आणि आमदारांशी संपर्क साधला. सायंकाळी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आमदारांची उपस्थिती बघितल्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आत्मविश्वास बळावला. शरद पवार यांनी दिवसभर सारी सूत्रे हालविली.  अजित पवारे हे नेपियन्सी रोडवर भावाच्या निवासस्थानी थांबले होते. अजितदादांकडून बंड शमण्याच्या दृष्टीने  प्रतिसाद मिळाला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2019 1:45 am

Web Title: deputy chief minister ajit pawar investigate acb abn 97
Next Stories
1 भारतात रोज २५ हजार टन प्लास्टिकचा कचरा
2 विदर्भातील चारही महापालिकांमध्ये भाजपचेच महापौर
3 नव्या महापौरांपुढे आर्थिक आव्हान
Just Now!
X