* अतिरिक्त भाडय़ाचा भरूदड, विलंबाचाही फटका
* यात्री संघटनेचा अहवाल
उन्हाळ आणि सनासुदीच्या काळात रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या विशेष गाडय़ा फक्त नावापुरत्याच विशेष असतात. आकारण्यात येणारे अतिरिक्त भाडे आणि प्रवासादरम्यान होणारा विलंब यामुळे या गाडय़ा नियमित गाडय़ांपेक्षाही अधिक तापदायक ठरतात, असे एका पाहणी अहवालातून दिसून आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या या गाडय़ांमध्ये प्रवाशांची गैरसोय आणि लूटही होते. विशेष म्हणजे याबाबत ९० टक्के प्रवाशांना याची कल्पना देखील नसते. याचा प्रत्यय गुरुवारी पुण्याहून नागपूरला आलेल्या विशेष गाडीतील प्रवाशांना आला. नियमित प्रवास भाडय़ापेक्षा ३० ते ४० टक्के अधिक भाडे असलेली ‘पुणे-नागपूर एसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन’ तब्बल सहा तास उशिरा नागपुरात आली. रेल्वे यात्री संघटनेचा विशेष अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये ९५ टक्के विशेष ट्रेन विलंबाने धावत असतात, असे नमूद करण्यात आले. व्यस्त मार्गावर दरवर्षी अनेक विशेष गाडय़ा सुरू करण्यात येतात, पण या गाडय़ा नियमित गाडय़ांच्या मार्गावरील खोडा ठरतात. नियमित गाडय़ांना मार्ग देण्यासाठी या गाडय़ांना ठिकठिकाणी थांबविले जाते. यामुळे या गाडय़ा अनेक तास विलंबाने धावत असतात. विशेष गाडय़ांसाठी उशिराने सुटणे आणि विलंबाने पोहोचणे हे आता नित्याचे झाले आहे.
विशेष गाडय़ांना अधिक भाडे आकारण्यात येते. डायनामिक श्रेणीतील भाडे स्थिर नसतात. या गाडय़ांचे भाडे विमानाच्या भाडय़ाप्रमाणे मागणीनुसार वाढत असतात. विशेष अतिजलद गाडीतून प्रवासाठी जादा भाडे आकारले जाते. मात्र, अतिजलद शुल्क भरल्यानंतरही ही गाडी विलंबाने धावते. ही बाब कुणीही गांर्भीयाने घेत नाही.

प्रवासी अनभिज्ञ
विशेष गाडय़ांना विलंब होतो. या गाडय़ा ठिकठिकाणी थांबवल्या जातात. याची ९० टक्के प्रवाशांना कल्पना नसते. विशेष गाडय़ातून प्रवासासाठी जादा रक्कम आकारली जाते. याबद्दल सुमारे ९७ टक्के प्रवासी अनभिज्ञ आहेत. विशेष गाडीबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध केली जात नाही. यामधून अतिरिक्त उत्पन्न कमावणे हा हेतू नसतो. परंतु रेल्वे विशेष गाडय़ांमध्ये वेगवेगळे अधिभार आकारून अधिक भाडे घेत आहे. शिवाय या गाडय़ा नियोजित वेळेत पोहोचत नाहीत.

विलंबाची कारणे
* विशेष गाडी ही अतिरिक्त असते. या गाडीला धावण्यासाठी मार्ग उपलब्ध नसतो तसेच रेल्वे स्थानकावर फलाट उपलब्ध नसतात.
* रेल्वे अधिकारी विशेष गाडीला पहिले प्राधान्य देत नाही. समजा, नियमित गाडी आणि विशेष गाडी सिग्नलच्या प्रतीक्षेत असेल अशावेळी नियिमत गाडीला आधी सिग्नल देऊन मार्ग मोकळा केला जातो. त्यानंतर विशेष गाडीचा विचार होतो.
* रेल्वेकडे विशेष गाडीसाठी वेगळ्या डब्यांची व्यवस्था नसते. उपलब्ध डब्यांचा वापर करून विशेष गाडी सोडावी लागते. त्यामुळे डब्यांची सफासफाई आणि देखभाल दुरुस्तीसाठी विलंब होतो.
* या गाडीसाठी उपलब्ध मनुष्यबळातून कर्मचारी द्यावे लागतात. त्यासाठी टीटी, गार्ड आणि इतर कर्मचारी पुरेसे नसतात.
* नियमित गाडय़ा वर्षभर धावतात. या गाडय़ांच्या कामगिरीवर अधिकाऱ्यांच्या मूल्यमापन होते. विशेष गाडीतील कामगिरीचा यासाठी विचार होत नाही.
राजेश्वर ठाकरे,